पीडितेचा शवविच्छेदन अहवाल जाहीर, गळ्यावर जखमा, हाडं मोडल्याची नोंद

नवी दिल्ली, १ ऑक्टोंबर २०२०: हाथरस सामूहिक बलात्कारातील पीडित युवतीचा दिल्लीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळलीय. घटनेला १४ ते १५ दिवस होऊन गेले आहेत. मात्र, प्रशासन आत्ता जागं झाल्याचं दिसतंय. या प्रकरणात प्रतीक्षेत असलेला पोस्टमॉर्टम अहवाल आज समोर आलाय. अहवालानुसार या युवतीच्या मानेवर व गळ्यावर मार लागला होता. यासह या युवतीच्या शरीरातील काही हाडं देखील मोडली होती. पोस्टमध्ये दिलेल्या वर्णनावरून तिच्यासोबत किती वेदनादायक कृत्य केलं गेलं असंल हे लक्षात येतं. अहवालात सांगण्यात आलं होते की, पीडितेच्या मृत्यूमागील मुख्य कारण विसरा’च्या अहवालानंतरच कळू शकंल.

अहवालात पीडित मुलीच्या घश्यावर जखमेची एक खूण असल्याचं सांगण्यात आलंय. शवविच्छेदन अहवालात असं म्हटलं आहे की, फक्त एकदाच नव्हे तर गळा दाबण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला गेलाय. पीडितेनं तिला वाचवण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले, त्यामुळं गळ्यातील हाडंही तुटलीत. विसरा अहवाल येण्याची अद्याप प्रतीक्षा केली जातेय. हा अहवाल समोर आल्यावरच मृत्यूचं नक्की कारण समजलं जाईल.

या शवविच्छेदन अहवालामध्येच झालेल्या घटनेविषयी माहिती देण्यात आलीय. यानुसार ही घटना १४ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजताची आहे. ही घटना घडल्यानंतर सुमारे सायंकाळी चार वाजता अलिगड रुग्णालयात पीडितेला भरती करण्यात आलं. २८ सप्टेंबरला या पीडितेची प्रकृती खालावली, त्यामुळं तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आलं. उपचारादरम्यान २९ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी पीडितेचा मृत्यू झाला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीवर बलात्कार झाला आहे की नाही याचा अहवाल आज येणं अपेक्षित आहे. सर्व फॉरेन्सिक नमुने आग्रा प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत, जिथं तपास सुरू आहे.

याप्रकरणी चारही आरोपींना अटक करण्यात आलीय. तसंच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारनं तीन सदस्यीय एसआयटीची टीम स्थापन केलीय. एसआयटीला सात दिवसांत आपला अहवाल सादर करावा लागणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा