इंदापूर, दि,२२मे २०२० : इंदापूर तालुक्यामध्ये पुणे-मुंबईसारख्या रेडझोनमधून येणाऱ्या नागरिकांची माहिती प्रशासनाला तत्काळ कळवावी जे नागरिक या स्थलांतरित लोकांची माहिती प्रशासनापासून लपवतील त्यांच्यावर शासकीय नियमानुसार गुन्हे दाखल होणार असल्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. इंदापूर शहरातील प्रशासकीय इमारत येथे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली.
यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसीलदार सोनाली मेटकरी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, पंचायत समिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा पोळ, इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल व इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर त्याचबरोबर विविध खात्याचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी दत्तात्रय भरणे म्हणाले की, इंदापूर तालुक्यात एकूण पाच रुग्ण झाले. त्यामध्ये प्रशासनाने उत्तम काम केले. मात्र प्रशासनाला काही लोक सध्या त्रास देत असून त्यांच्यावर शासकीय नियमानुसार गुन्हे दाखल तर होणारच, मात्र पुणे-मुंबईसारख्या रेड झोनमधून इंदापूर तालुक्यात आलेल्या नागरिकांची माहिती प्रशासनाला तात्काळ कळवावी जे लोक ही माहिती प्रशासना पासून लपवतील त्यांच्यावर शासकीय नियमानुसार गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत अशी माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
इंदापूर तालुक्यात गुरुवारी (दि.२१) रोजी दोन कोरोनाचा रुग्ण तालुक्यात सापडल्याने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्या रुग्णांचा सर्व इतिहास पडताळून पाहिला, तरी देखील प्रशासनाला त्याची माहिती नसल्याने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे प्रशासनावर संतापले आणि प्रशासनाने यापुढे चोख काम करावे अशाही सूचना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी दिल्या.
न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे