पुणे, १६ डिसेंबर २०२२ : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजित दुसरे बालाघाट मराठी साहित्य संमेलन सुप्रसिद्ध साहित्यिक शरद गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता. १७) यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, तुळजापूर येथे संपन्न होत आहे. प्रमुख अतिथी म्हणून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची उपस्थिती लाभणार आहे. आ. राणाजगजितसिंह पाटील कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आहेत.
संमेलनाच्या निमंत्रकपदी योगेश केदार यांची निवड करण्यात आल्याची माहिती परिषदेचे राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे यांनी दिली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे असतील. उद्घाटन सत्रानंतर इतिहास संशोधक डॉ. सतीश कदम यांच्या अध्यक्षतेखाली ‘मराठी साहित्यात मराठवाड्याचे योगदान’ हा परिसंवाद होणार असून, संगीता जामगे, सर्जेराव वाघमारे आदी मान्यवर वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत. त्यांतर सुप्रसिद्ध कवी युवराज नळे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे, यामध्ये विलास हडवले, राजेंद्र अत्रे, मयुरी बाबर, दास पाटील या कवींसह अनेक मान्यवरांचा सहभाग असणार आहे.
या साहित्य संमेलनात विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यात साहित्यिक मदन देगावकर यांना लोककवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार, डॉ. सतीश महामुनी यांना दिनकरराव जवळकर राज्यस्तरीय पत्रकाररत्न पुरस्कार, राजेंद्र गुंड यांना राज्यस्तरीय युवा पत्रकाररत्न पुरस्कार, शिवशंकर गवळी यांना राज्यस्तरीय बालाघाट कृषीरत्न पुरस्कार आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. अतुल कुलकर्णी यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल विशेष सन्मान करून गौरविण्यात येणार आहे, अशी माहितीही पतंगे यांनी दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सतीश पाटील