बिहार निवडणूक: तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस

पाटना, ५ नोव्हेंबर २०२०: सध्या बिहार निवडणुकीकडं सर्वांचेच लक्ष लागलं आहे. यंदा बिहारच्या निवडणुका तीन टप्प्यांमध्ये घेण्यात येणार आहेत. त्यातील दोन टप्पे पार पडले आहेत. तर तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळं बिहारमध्ये आज प्रचाराचं घमासान युद्ध पाहण्यास मिळणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान साठी १५ जिल्ह्यातील ७८ मतदारसंघात ७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात एकूण १ हजार २०८ उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानासह वाल्मिकीनगर लोकसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक होणार आहे. याठिकाणी ७ उमेदवार रिंगणात आहेत.

शेवटच्या टप्प्यात महाआघाडीतून काँग्रेसचे २५ तर आरजेडीचे ४६ उमेदवार रिंगणात आहेत. तर एन डी ए कडून भाजप ३५ जागांवर आणि जेडीयू ३७ जागी लढत आहेत. ५ ठिकाणी सीपीआय (माले), तर २ ठिकाणी सीपीआयने आपले उमेदवार उतरवले आहेत. याचबरोबर व्हीआयपी ५ तर हम एका जागेवर निवडणूक लढवत आहे. तर एम आय एम च्या ओवेसी यांनी जवळपास २ डझन जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.

मुजफ्फरपुर मतदारसंघात सर्वाधिक उमेदवार रिंगणात आहेत. मुजफ्फरपुर मतदार संघात २८ उमेदवार मैदानात उतरले आहेत. तर जोकीहाट, बहादूरगंज, त्रिवेणीगंज आणि ढाका या मतदारसंघात प्रत्येकी ९ उमेदवार आमने-सामने आहेत. शेवटच्या टप्प्यात सीमांचल या मुस्लीम बहुल भागात जोरदार संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर यादव बहुल कोसी आणि ब्राह्मण बहुल मिथिलांचल मधील काही जागांवरही अतीतटीचा सामना होताना पहावयास मिळणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा