मुंबई, 8 जानेवारी 2022: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना ट्विटरवर ‘मराठी राबडी देवी’ असं लिहिल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर सेलने भाजप सोशल मीडिया सेलचे प्रभारी जितेन गजरिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. पोलिसांच्या सायबर सेल युनिटने वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये गजरिया यांचा जबाब नोंदवल्यानंतर ही कारवाई करण्यात आलीय.
गुरुवारी गजरिया यांची अधिकाऱ्यांनी साडेचार तास चौकशी केली, त्यानंतर सायंकाळी उशिरा त्यांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी गजरियाला अटक करण्यासाठी पुणे सायबर सेलचे पथक मुंबईला रवाना झालं आहे.
वास्तविक, जितेन गजरिया यांनी 4 जानेवारी रोजी मराठी राबडी देवी कॅप्शनसह रश्मी ठाकरे यांचा फोटो पोस्ट केला होता. मात्र, राजकारण तापल्यानंतर गजरिया यांनी हे ट्विट डिलीट केलं.
याशिवाय गजरिया यांच्यावर जात आणि धर्माबाबत वादग्रस्त पोस्ट अपलोड केल्याचा आरोप आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गजरिया यांच्याविरुद्ध कलम 153ए, 500, 505 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. असं कॅप्शन राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीसाठी वापरण्यात आल्याने आता राजकारण सुरू झालं आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी गजरिया यांच्यावर निशाणा साधत ‘कोण आहे जितेन गजरिया? तो कांगारूप्रमाणं राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आला आणि आज तो महाराष्ट्रातील महिलांबद्दल, रश्मी भाभींबद्दल अशी अपमानास्पद टीका करत आहे.
भाजपने गंभीर आरोप केले
याप्रकरणी भाजपने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत राज्यातील सत्ताधारी ठाकरे सरकार पोलिसांचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला आहे. भाजप नेते राम कदम म्हणाले की, ठाकरे सरकार जनतेचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेत आहे. भाजप खासदार हेमा मालिनी यांच्याबद्दल महाराष्ट्र सरकारच्या एका मंत्र्याकडून अशोभनीय भाषण केलं जातं, तेव्हा कारवाई होत नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे