छत्रपती संभाजीनगर, १० मार्च २०२३ : औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आल्याने औरंगाबाद नामांतरविरोधी कृती समितीकडून हे साखळी उपोषण करण्यात येत आहे. याचे नेतृत्व हे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील करीत आहेत. ते मागील पाच दिवसांपासून साखळी उपोषणाला बसले आहेत. काल रात्री औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या विरोधात खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात ‘कँडल मार्च’ काढण्यात आला होता. या ‘कँडल मार्च’मध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. हा ‘कँडल मार्च’ जिल्हाधिकारी कार्यालय ते भडकल गेटपर्यंत काढण्यात आला होता. ‘कँडल मार्च’ भडकल गेट येथे पोचल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून ‘कँडल मार्च’ची सांगता करण्यात आली. या आंदोलनाचे वेगवेगळे टप्पे असून, हा दुसरा टप्पा आहे; तसेच शुक्रवारी (ता. १०) ‘शहर बंद’ची हाकही देण्यात आली आहे.
नामांतराला विरोध असणारे नागरिक या ‘कँडल मार्च’मध्ये मोबाईल टॉर्च, तसेच इलेक्ट्रॉनिक मेणबत्ती घेत सहभागी झाले होते. आंदोलनात सहभागी झालेले कोणत्या जातीचे किंवा धर्माचे नसून ते नामांतरास विरोध असणारे नागरिक आहेत, असे मत खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले.
जनतेचा कौल घेण्याची मागणी ही केली होती
या उपोषणावेळी खासदार इम्तियाज जलील यांनी शहराचे नाव बदलायचे असेल तर जनतेचा कौल घ्या आणि मग निर्णय घ्या. निवडणूक प्रक्रिया राबवून कोणाच्या बाजूने जास्त मते होतील ते लक्षात घ्या आणि त्यानंतरच आमच्यावर हा निर्णय लादा. निर्णय लादणारे तुम्ही कोण होता? असा संतप्त प्रश्न खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : विनोद धनले