जेजुरी १४ डिसेंबर २०२३ : देवस्थानांच्या ट्रस्ट प्रॉपर्टीला कुळाची नावे लावू नयेत असा नियम असूनही प्रॉपर्टीला कुळाची नावे लावली जातात. यामुळे देवस्थानांचे अतिशय नुकसान होत असुन या प्रकरणी तलाठी तसेच मंडलाधिकारी घोटाळा करत आहेत असा आरोप करवीर पिठाच्या आदी शंकराचार्यांनी केला आहे. बुधवारी जेजुरीच्या खंडोबा चंपाषष्टी निमित्त झालेल्या घटस्थापना कार्यक्रमासाठी करवीरपीठाचे शंकराचार्य उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी शासनाच्या कार्यपद्धतीवर प्रचंड नाराजी व्यक्त करत आजच्या सरकारला सद्बुद्धी मिळू दे असे मत मांडले.
बुधवारी श्री खंडोबा देवाचा चंपाषष्ठी उत्सव जेजुरी गडावर उत्साहात साजरा झाला. सालाबाद प्रमाणे पुजारी- सेवेकरी आणि आद्य श्री नृसिंह भारती शंकराचार्य करवीर पीठ कोल्हापूर यांचे शुभहस्ते साडेबारा वाजता घटस्थापना करण्यात आली. यावेळी वेदमूर्ती पुरोहित शशिकांत सेवेकरी काका, मंगेश खाडे गुरुजी यांच्या मंत्रोच्चारात आणि सनई चौघडा वादनामध्ये अभिषेक उत्सव मूर्ती घटस्थापनेच्या ठिकाणी बसवून विधिवत पूजा करण्यात आली. या प्रसंगी नृसिंह भारती शंकराचार्यजी, पुजारी सेवेकरी वर्ग, श्री मार्तंड देव संस्थान विश्वस्त मंडळ आणि हजारो भाविकांची उपस्थिती होती.
यावेळी श्री मार्तंड देवसंस्थांचे प्रमुख विश्वस्त पोपटराव खोमणे, विश्वस्त मंगेश घोणे, ॲड. पांडुरंग थोरवे, ॲड. विश्वास पानसे, डॉ.राजेंद्र खेडेकर, अनिल सौंदडे, अभिजीत देवकाते तसेच पुजारी सेवेकरी गणेश आगलावे, अविनाश सातभाई, प्रशांत सातभाई, बाळासाहेब दीडभाई, देवल बारभाई, मल्हार बारभाई, धनंजय आगलावे यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आल्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी : विजयकुमार हरीश्चंद्रे