पुणे, दिनांक २९ सप्टेंबर २०२२ : पुणे शहरातील चांदणी चौक येथील पूल पाडण्यासाठी एक ऑक्टोबर रोजी शनिवारी रात्रीपासून वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. १ ऑक्टोबर रोजी शनिवारी रात्री ११ वाजल्यापासून रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याबाबत पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी आदेश दिले आहेत. या कालावधीत वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता असल्याने वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या कालावधीमध्ये मुंबई-बंगलुरू महामार्गावरील मुंबईकडून येणारी जड वाहतूक ही उर्से टोलनाका येथे थांबविण्यात येणार आहे. तसेच साताऱ्याकडून येणारी जड वाहतूक खेड शिवापूर टोलनाक्याजवळ थांबविले जाईल.मुंबई-बंगलुरू महामार्गावरील शिंदेवाडी ते उर्से टोलनाका यादरम्यान दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या जड वाहनांच्या वाहतूकी बंद ठेवली जाईल.त्याचप्रमाणे मुंबई-बंगलुरू महामार्गावरील डुक्कर खिंड ते घोडावत चौक (पिंपरी-चिंचवड आयुक्तालय) यादरम्यान दोन्ही बाजुने सर्व प्रकारच्या वाहनांसाठी वाहतूक बंद असेल .
वाहतुकीसाठी मार्ग बंद असताना नागरिकांची गैरसोय होऊ नये त्यासाठी पर्यायी मार्ग पुढील प्रमाणे आहेत. मुंबई मार्गे येणारी हलकी व प्रवासी वाहने उर्से टोलनाक्यावरून जुन्या पुणे मुंबई रस्त्याने निगडी मार्गे भक्ती शक्ती चौक, नाशिक फाटा येथून संचेती चौकातून टिळक रोडमार्गे जेधे चौकात आणि तेथून पुणे-सातारा रोडने कात्रज चौकाकडे जातील. येथून वाहन चालकांनी जुना कात्रज बोगदामार्गे साताऱ्याला किंवा कात्रज चौक नवले ब्रिजमार्गे डावीकडे वळून मुंबई-बंगलुरू महामार्गाने इच्छितस्थळी जातील.
वाकड चौकातून वाहने डावीकडे वळून राजीव गांधी पुलावरुन विद्यापीठ मार्गे संचेती चौकातून खंडोजीबाबा चौकमार्गे टिळक रोडने पुणे सातारा रोडने वाहने कात्रज चौकाकडे जातील. त्याचबरोबर वाहन चालक जुना कात्रज बोगदा मार्गे साता-याकडे किंवा कात्रज चौकातून नवले ब्रिजमार्गे मुंबई-बंगलुरु राष्ट्रीय महामार्गाने मार्गक्रमण करतील.
त्याचप्रमाणे राधा चौक डावीकडे वळून बाणेर रोडने विद्यापीठ चौक तेथून संचेती चौक मार्गे खंडोजीबाबा चौकातून टिळक रोडने पुणे सातारा रोडमार्गे कात्रज चौक येथे येतील व तेथून जुना कात्रज बोगदामार्गे किंवा नवले पुलाकडे येऊन मुंबई बंगलुरु राष्ट्रीय महामार्गाने साताऱ्याकडे जातील.
साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या हलक्या व प्रवासी वाहनांसाठी पर्यायी मार्ग पुढील प्रमाणे आहेत. खेड शिवापूर टोलनाका, शिंदेवाडी, जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक, पुणे सातारा रोडने जेधे चौक, डावीकडे वळून सारसबाग, पुढे डावीकडे वळून टिळक रोडने खंडोजीबाबा चौक, फर्ग्युसन रोडने विर चाफेकर चौक, डावीकडे वळून विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरुन औंध वाकड रोडने वाकड चौक, डावीकडे वळून पुढे यु टर्न घेऊन मुंबई- बंगलुरु राष्ट्रीय महामार्गाने इच्छितस्थळी जातील.
साताऱ्यामार्गे येणाऱ्या वाहनांसाठी दुसरा पर्याय मार्ग पुढील प्रमाणे. खेड शिवापूर टोलनाका, शिंदेवाडी, जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक, डावीकडे वळून नवले पुल, वडगांव पुल अंडरपास उजवीकडे वळून, सिंहगड रोडने राजाराम पुल, डी.पी. रोडमार्गे नळस्टॉप, लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड, विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरुन औंध वाकड रोड मार्गे वाकड चौक, डावीकडे वळून पुढे यु टर्न घेऊन मुंबई बंगलुरु राष्ट्रीय महामार्गाने मार्गस्थ होतील.
मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी तिसरा पर्यायी मार्ग खेड शिवापूर टोलनाका, शिंदेवाडी, जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक, डावीकडे वळून नवले ब्रिज, वडगांव ब्रिज आणि वारजे ब्रिज अंडरपास उजवीकडे वळून, आंबेडकर चौक, वनदेवी चौक, कर्वे पुतळा चौक, नळस्टॉप, लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड, विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरुन औंध वाकड रोड मार्गे वाकड चौक, डावीकडे वळून पुढे यु टर्न घेऊन मुंबई-बंगलुरु महामार्गाने वाहने मार्गस्थ होतील.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर