चेतेश्वर पुजाराचे कसोटी सामन्यांचे शतक पूर्ण होणार; पंतप्रधान मोदींनी केले कौतुक

दिल्ली, १५ फेब्रुवारी २०२३ : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंचे योगदान आपल्या सर्वांनाच माहिती आहे. भारतीय संघात असेच योगदान देणारा चेतेश्वर पुजारा हा भारतीय खेळाडू त्याचा १०० वा कसोटी सामना खेळणार आहे. १७ फेब्रुवारीपासून दिल्लीत सुरू होणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजारा शंभरावी कसोटी खेळून १०० कसोटी सामन्यांचा टप्पा ओलांडणार आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मिळाल्या शुभेच्छा-

चेतेश्वर पुजाराच्या या कामगिरीबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून त्याचे अभिनंदन करण्यात आले. शंभराव्या कसोटीपूर्वी पुजारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यास पोचला त्यावेळी मोदींकडून त्याला विशेष शुभेच्छा मिळाल्या. याच क्षणांचा आनंद व्यक्त करीत, ‘हे क्षण माझा उत्साह वाढविणारे आहेत. पंतप्रधान मोदींना भेटणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. या भेटीसाठी पंतप्रधान मोदी यांचे मनःपूर्वक आभार’ असे लिहीत चेतेश्वर पुजाराने मोदींसोबतच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. तर चेतेश्वर पुजारा याचे ट्विट रीट्विट करीत, ‘पुजाराला भेटून खूप आनंद झाला. मी त्याला त्याच्या शंभराव्या कसोटीसाठी आणि कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.’ असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

चेतेश्वर पुजाराची आतापर्यंतची कामगिरी-

चेतेश्वर पुजारा हा कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक चेंडूंचा सामना करणारा भारतीय फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत १५ हजार ७९७ चेंडूंचा सामना करीत ९९ कसोटी सामन्यांत ४४.१५ च्या सरासरीने ७ हजार २१ धावा केल्या आहेत. यामध्ये १९ शतके आणि ३४ अर्धशतके यांचा समावेश आहे. ९९ कसोटी सामन्यांनंतर त्याचा हा शंभरावा कसोटी सामना कसा पार पडणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा