नाट्यछटा, चित्र अन्‌‍ निसर्गाच्या गोष्टींमध्ये रमली मुले नुक्कड बालसाहित्य संमेलनात मुलांची धम्माल

पुणे, १० जानेवारी २०२३ : चित्रांची रंगीबेरंगी दुनिया, नाट्यछटा, एकापात्रिका, छान छान गोष्टी आणि निसर्गातील आश्चर्यकारक गमती जमतींमध्ये रमत मुलांना एका अनोख्या भावविश्वाची सफर घडली. नमित्त होते ते नुक्कड बालसाहित्य संमेलनात मुलांसाठी आयोजित केलेल्या वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे.

उद्घाटन सत्रानंतर ‘ऐकताय ना माझी कविता’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विवेक साहित्य मंचतर्फे घेण्यात आलेल्या काव्यस्पर्धांमधील निवडक १२ बालकविंचे स्वरचित कवितांचे सादरीकरण झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री आश्लेषा महाजन होत्या. त्यानंतर जी. ए. कुलकर्णी यांच्या ‘बखर बिम्मची’ या कथेवर आधारित रंगभाषातर्फे नाट्यसादरीकरण करण्यात आले. याचे दिग्दर्शन अमृत सामक यांचे होते.

‘बोलू चित्रांशी-रंगांशी’ या सत्रात बालसाहित्यकार राजीव तांबे यांनी चित्रकार गिरीश सहस्त्रबुद्धे यांना बोलते केले. या गप्पांमधून गिरीश सहस्त्रबुद्धे यांनी चित्र कसे साकारले जाते याचे गुपित शालेय विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखविले. कलेच्या क्षेत्रात गायक, वादक यांचे सादरीकरण बघता येते पण चित्रकार चित्र कसे काढतो हे सहसा बघायला मिळत नाही. या संकल्पनेतून मुलांच्या कल्पनाशक्तीला, निरिक्षण शक्तीला चालना देत चित्रांच्या दुनियेत रंग भरण्यात आले. प्रत्येक चित्रकाराची चित्र रेखाटण्याची हातोटी निराळी असते त्यामुळे मुलांना अनेक चित्रकारांची प्रदर्शने दाखवून पालकांनी वैविध शैलींची ओळख करून द्यावी, असे आवाहन सहस्त्रबुद्धे यांनी पालकांना केले.

विवेक व्यासपीठतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण बालसाहित्यकार राजीव तांबे, डॉ. सविता केळकर, डॉ. आनंद काटीकर, पुणे मराठी ग्रंथालयाचे अध्यक्ष धनंजय बर्वे यांच्या हस्ते नुक्कड बालसाहित्य संमेलनाच्या अखेरच्या सत्रात करण्यात आले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा