मंचर : आंबेगाव तालुक्यातील जवळपास ५० हजार लोकसंख्या असणारं मंचर हे तालुक्यातील सर्वात मोठं गाव. महिना-दीड महिन्यांपूर्वी आपल्या देशात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याने देशात खळबळ उडाली होती. मात्र सरपंच दत्ता गांजाळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व ग्रामस्थांनी कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी नियोजन करून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. २० मार्च २०२० रोजी संपूर्ण शहरात बंद पाळण्यात आला.
हे संकट मोठे असल्याचे ओळखूनच प्रभावी यंत्रणा राबविण्यासाठी सोडियम हायपोक्लोराईट द्रावणाची संपूर्ण शहरात फवारणी करून परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. तसेच लॉकडाऊन काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा नियमितपणे पुरवठा व्हावा म्हणून महाराष्ट्रात सर्वप्रथम अत्यावश्यक सेवा घरपोच देण्याचा निर्णय घेऊन गावातील नागरिकांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी निर्जंतुकीकरण कक्षाची उभारणी करण्यात आली.
प्रशासकीय अधिकाऱ्यांचा ताण कमी व्हावा म्हणून लॉकडाऊन काळात प्रत्येक रविवारी जनता कर्फ्यूचे आयोजन करण्यात येऊन गावची भैरवनाथ यात्रा रद्द करून परप्रांतीय लोकांसाठी अन्नधान्याचे व किराणा मालाचे वितरण करण्यात आले. तसेच शहरातील गरीब व गरजू लोकांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून जेवण व जीवनावश्यक वस्तूंचे स्थानिक प्रशासन व विविध सेवाभावी संस्था यांच्या वतीने दररोज वाटप करण्यात येत आहे.
गावचे सरपंच दत्ता गांजाळे ह्या सर्व उपाययोजना करण्यासाठी घरी न जाता ग्रामपंचायत कार्यालयातच महिनाभरापासून मुक्कामी असून ते स्वतः फार्मासिस्ट असल्याने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आवाहन केल्याप्रमाणे त्यांनी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात फार्मासिस्ट म्हणून सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून मागणीही केली आहे.
सरपंच व मंचर ग्रामपंचायत राबवित असलेल्या कोरोना उपाययोजनाबाबत विविध उपक्रमांची माहिती शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना कळवल्यानंतर आज सरपंच दत्ता गांजाळे यांना थेट मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी फोन करून सर्व उपक्रमांचे कौतुक करून स्वतःची व गावाची काळजी घेण्याबाबत सांगितले. यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
आंबेगाव -साईदिप ढोबळे