तुळजाभवानी मंदिरात अधिकाऱ्यांनी मर्जीतल्या लोकांना खिरापतीसारखे व्हीआयपी पास वाटल्याने उडाला गोंधळ

तुळजापूर, धाराशिव २३ ऑक्टोबर २०२३ : तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवनिमित्त तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक देशभरातील दररोज येत आहेत. अष्टमी, नवमीनिमित्त तर तुळजाभवानी मंदिर लाखो भाविकांनी ओसंडून वहात आहे. त्यामुळे साहजिकच प्रशासनावर ताण पडला आहे. त्यातच उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे आणि मंदिर संस्थांचे व्यवस्थापक सोमनाथ माळी यांनी, खिरापत वाटावी त्याप्रमाणे आपल्या मर्जीतील लोकांना भवानी दर्शनाचे व्हीआयपी पास वाटले आहेत. यामुळे मंदिरातील कार्यालयात एकच गोंधळ उडाला. मंदिर संस्थानला एका पास मागे फक्त पाचशे रुपये मिळत आहेत.

भाविकांना तुळजाभवानी दर्शनासाठी रांगेत उभारून बराच वेळ दर्शनासाठी ताटकळावे लागते. त्यामुळे मंदिर संस्थांच्यावतीने तात्काळ दर्शनासाठी व्हीआयपी पासची व्यवस्था केलेली आहे. व्हीआयपी म्हणजे अतिमहत्त्वाचा व्यक्ती म्हणजेच मुख्यमंत्री, केंद्र व राज्यातील मंत्री, सनदी अधिकारी यांचा यामध्ये समावेश होतो. मात्र उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे व्यवस्थापक सोमनाथ माळी यांनी या नियमाला हरताळ फासुन त्यांच्या मर्जीतील व ओळखीच्या लोकांना व्हीआयपी पास वाटले. एकीकडे राज्यातील भाविक भक्त पायी चालत येऊन रांगेत तास न् तास थांबून दर्शनासाठी उभे आहेत. तर दुसरीकडे अधिकारी भाविकांवर अन्याय करत आहेत.

हा उत्सव अतिशय शांततेत पार पाडावा यासाठी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे व पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे वेगवेगळ्या पातळीवर काम करीत आहेत. मात्र अशा काही उपद्रवी अधिकाऱ्यांमुळे त्या कामावर पाणी फेेरण्याचे काम होत आहे. अशा गैरजबाबदार अधिकाऱ्यांवर, जिल्हाधिकारी डॉ ओंबासे कारवाई करतील का? असा प्रश्न आता भाविकातून विचारला जाऊ लागला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : रहिम शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा