“रडणाऱ्यांना शिवसेनेत स्थान नाही”; सुभाष साबणेंच्या भाजप प्रवेशावर संजय राऊतांचा टोला

मुंबई, 5 ऑक्टोंबर 2021:  जिल्ह्यातील देगलूर बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक ऑक्टोबरमध्ये होणार असल्याचे जाहीर करण्यात आलंय. देगलूरमधील शिवसेनेचे नेते माजी आमदार सुभाष साबणे हे शिवसेनेत नाराज होते. हे पाहता सुभाष साबणे यांना देगलूर बिलोली जागेसाठी भाजपने उमेदवारी जाहीर केलीय. यानंतर सुभाष साबणे यांनी चंद्रकांतदादांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे नांदेडमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. साबणेंच्या भाजपा प्रवेशामुळे आता ही निवडणूक चांगलीच चुरशीची होणार असल्याचे सांगितले जात आहे.
सुभाष साबणे यांनी परवाच सेना सोडण्याची घोषणा केली होती. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. मात्र साबणेंचा पक्षप्रवेश शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे. शिवसैनिक रडका नसतो, तो लढणारा असतो, अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी साबणेंवर हल्लाबोल केलाय.
“ते शेतकऱ्यांचे दुखः समजू घ्यायला गेले होते की नांदेडला जाऊन शिवसेनेचे माजी आमदारांना पक्षात घ्यायला गेले होते हे लोकांना कळलं आहे. गेली अनेक वर्ष ते काँग्रेस, राष्ट्रवादीचे लोक घेत होते. भाजपाकडे स्वतःचे काही नाही. निवडणूक लढण्यासाठी त्यांनी आमचा माणूस घेतला तोही रडका. शिवसैनिक हा परिस्थितीच्या विरुद्ध रडत नाही लढतो. रडणाऱ्यांना शिवसेनेत स्थान नसतं. पळपुट्यांना शिवसेनेत स्थान नसतं. पण भाजपाने हे काही नविन धोरण सुरु केलं आहे स्वतःचे काही नसल्यामुळे दुसऱ्यांची लोक घ्यायचे. हे फार काळ चालत नाही,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
या आधी “शिवसेनेत माझं कुणाशी वाकडं नव्हतं. अशोक चव्हाण यांच्या जिल्ह्यातल्या एकाधिकारशाहीला कंटाळून आपण शिवसेना सोडतोय”, असं म्हणत सुभाष साबणे यांनी सेनेला जय महाराष्ट्र केला. चव्हाणांच्या एकाधिकारशाहीमुळं नांदेड जिल्ह्यात शिवसेना वाढणार नाही किंबहुना अशोक चव्हाण वाढू देणार नाही, असंही साबणे म्हणाले होते. त्यावर काल संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता, ‘शिवसैनिक रडका नसतो, तो लढणारा असतो’, एवढ्या सहा शब्दात राऊतांनी साबणेंवर प्रहार केला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा