मुंबई, ३१ मार्च २०२१: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संगणकीय प्रणालीवर २१ मार्चला पहाटे अडीच वाजेच्या सुमारास रेन्समवेअरचा सायबर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र सायबर तज्ञांसह महामंडळाच्या तंत्रज्ञांनी हा हल्ला निकामी करण्यात बऱ्याच अंशी यश मिळवले आहे. संकेतस्थळासह बहुतांश ग्राहकाभिमुख सेवा सुरू झाल्या असून उर्वरित सेवा बुधवारपर्यंत सुरू होतील, अशी माहिती महामंडळाने दिली. हल्लेखोरांनी खंडणीची मागणी ईमेलद्वारे केली आहे, असा खुलासा महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळाच्यावतीने करण्यात आला आहे.
‘मऔवि’ महामंडळाच्या सर्व प्रणाली ESDS (क्लाऊड सेवा प्रदाता) आणि महामंडळाअंतर्गत स्थानिक सर्व्हरवर होस्ट केलेल्या आहेत. तसेच सुरक्षा आणि देखरेखीसाठी ट्रेंड मायक्रो अँटी-व्हायरसचा वापर केला जातो. SYNack या रॅन्समवेअरने ‘मऔवि’ महामंडळाच्या मुख्यालयात होस्ट केलेल्या लोकल सर्व्हर सिस्टीम आणि डेटा-बेस सेवांवर परिणाम केला आहे. तसेच राज्यातील प्रादेशिक कार्यालयांमध्ये असलेल्या संगणकांनाही बाधा पोहचली आहे. हल्लेखोरांनी केलेल्या ईमेलमध्ये हल्ल्याची माहिती दिलेली आहे. मात्र खंडणीच्या रक्कमेचा थेट उल्लेख केलेला नाही.
सायबर हल्ल्यानंतर संगणकीय यंत्रणेत व्हायरसचा प्रसार होऊ नये यासाठी नेटवर्कवरून संगणक तातडीने डिस्कनेक्ट करण्यात आले आहेत. महामंडळाची एक खिडकी योजना, ईआरपी, बीपीएएमएस, संगणकीय भू-वाटप प्रणाली व पाण्याची देयके या यंत्रणांच्या बॅकअप फाइल्स वेगळ्या नेटवर्कवर संग्रहित केल्या असून त्या सर्व सुरक्षित आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे