पुणे, १८ ऑगस्ट २०२२: पुण्यात दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कोरोना संकटामुळे मागील दोन वर्षांपासून हा उत्सव साध्या प्रकारे साजरा केला जात होता. मात्र पुणे पोलिसांकडून दहीहंडी उत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे.
दहीहंडी उत्सव हा शुक्रवार १९ ऑगस्ट रोजी होणार आहे, मात्र गोविंदाना रात्री उशीरापर्यंत हा उत्सव साजरा करता येणार नाही. हा उत्सव रात्री दहा वाजेपर्यंत करता येणार असून त्यासाठी पुण्यातील मंडळींना पोलिसांनी नियमावली जाहीर केली आहे. तशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असून त्यासाठी पुणे शहरातील स्थानिक पोलिस अधिकारी, कर्मचारी, एसआरपीएफ, होमगार्ड यांचा बंदोबस्त असणार आहे. दहीहंडी उत्सवात मद्य प्राशन करुन धिंगाणा घालणारे तसेच महिला छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांची विशेष नजर असणार आहे.
दहीहंडी उत्सव साजरा करताना पोलिसानी दिलेल्या नियमावली नुसार रात्री दहा वाजेपर्यंत दहीहंडी फोडावी लागणार आहे. पुण्यातील मध्य भागातील मंडई आणि परीसरात मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव साजरा केला जात असून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तरी मंडळांना दिलेल्या सूचनांचे पालन करावे अशी सूचना देण्यात आली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर