बारामती, १० ऑगस्ट २०२०: बारामती शहरातील विकास मारुती शिंदे या तरुणाने अनेक वेळा शेजारी असणाऱ्या अवैद्य परप्रांतीय भंगार व्यावसायिकांच्या विरोधातील तक्रारी नगर पालिकेत दिल्या आहेत. मात्र, पालिकेचे अधिकारी केवळ नोटीस देऊन जातात याबाबतीत ठोस पाऊल उचलावे यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तो आमरण उपोषण करणार असल्याचा शिंदे यांनी मुख्याधिकारी यांना अर्ज दिला आहे.
बारामती नगर परिषदेच्या भोंगळ कारभारा विरोधात दि. १५ ऑगस्ट रोजी विकास मारुती शिंदे हा तरुण बेमुदत आमरण उपोषण करणार आहे. येथील परप्रांतीय भंगार व्यावसायिकांच्या विरोधात शिंदे यांनी बारामती नगर परिषद व बारामती शहर पोलीस स्टेशन येथे वारंवार पत्र व्यवहार केला आहे. बारामती फलटण रोड वरील सातव वस्ती जवळ या परप्रांतीयांनी अनधिकृत पत्र्याचे शेड उभी करुन येथे भंगार ठेवत आहेत. अनेक वेळा येथे चोरीचा माल ठेवला जात असल्याचे तक्रारीत उल्लेख आहे.
येथे उभ्या केलेल्या गोडाऊनला कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे शिंदे यांनी सांगितले. तर येथे राहत असलेले लोक हे जुगार खेळतात, दारू पिऊन धिंगाणा घालतात त्यांना कोणी विचारणा केल्यास हे लोक अंगावर धावून येत असल्याचे या तक्रारीत म्हणाले आहे. बारामती नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी या व्यवसायीकांना नोटीसा दिल्या आहेत मात्र काहीही कारवाई केलेली नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यामाव