पुणे, १६ एप्रिल २०२१: पुण्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. पालिका प्रशासन देखील मोठ्या प्रमाणावर परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न करत आहे. शहरात ऑक्सिजन बीड, आयसीयू बेड, जास्तीत जास्त टेस्टिंग करणे तसेच लसीकरण वाढवणे यांसारख्या कामांना वेग आणत आहे. मात्र, शहरातील वाढती रुग्ण संख्या पाहता तेवढ्या प्रमाणात बेड उपलब्ध करणे ही सर्वात मोठी समस्या महानगरपालिकेसमोर उभी राहिली आहे.
सध्या शहरात एकही बेड उपलब्ध नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय महानगर पालिकेने खाजगी रुग्णालयातील ८०% बेड देखील कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यासाठी सांगितले आहे. मात्र असे असताना देखील ससून रुग्णालयामध्ये केवळ ५०० बेड कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. ससून रुग्णालयाची बेड संख्या १,७५० एवढी आहे. ससून मधील ६० टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवले तर येथे १,०५० बेड उपलब्ध होऊ शकतात.
हे पाहता महानगरपालिकेने ‘ससून’ मधील कोविड बेड्सची संख्या वाढवावी, अशी मागणी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्राद्वारे केली. महापालिकेच्या स्तरावर सर्व हॉस्पिटल्स आज पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. शिवाय खाजगी हॉस्पिटलचेही ८०% बेड्स ताब्यात घेण्यात आले आहेत.
पुणे शहरात काल नव्याने ५ हजार ३९५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ३ लाख ४९ हजार ४२४ इतकी झाली आहे. तर काल शहरातील ४ हजार ३२१ कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या २ लाख ८९ हजार १२२ झाली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे