मनातील बाबी ओळखणे ही आंतरेंद्रिय शक्ती नसून चलाखी आहे; ‘नवभारत’मधील कार्यक्रमात विशाल विमल यांचे प्रतिपादन

पुणे, ५ मार्च २०२३ : आंतरेंद्रिय शक्तीद्वारे कुणाच्या मनात काय चालले आहे, हे सांगण्याचा कथित दावा बुवाबाबा करतात; मात्र यात कोणतीही आंतरेंद्रिय शक्ती नसून चलाखी आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य पदाधिकारी विशाल विमल यांनी केले.

शिवणे येथील नवभारत विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ‘विज्ञान आणि चमत्कार : जुगलबंदी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी विशाल विमल आणि ‘अंनिस’च्या शिवाजीनगर शाखेच्या पदाधिकारी माधुरी गायकवाड यांच्यामध्ये ‘चमत्कार आणि विज्ञान’ यासंबंधी जुगलबंदी रंगली. यावेळी ‘अंनिस’च्या शिवाजीनगर शाखेचे पदाधिकारी स्वप्नील भोसले, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. आंनद पिंगळे, पर्यवेक्षक श्री. ज्ञानदेव कुंभार उपस्थित होते. श्रीमती किरण कोळी यांनी स्वागत केले, तर विज्ञान शिक्षिका रेश्मा यादव यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थी शुभम साठे याने राष्ट्रीय विज्ञान दिनाची माहिती सांगितली.

भारतीय राज्यघटनेत नागरिकांच्या कर्तव्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करावा, हे सांगितले आहे. याअनुषंगाने चमत्कारांमागील विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, कार्यकारण भाव प्रयोगातून समजावून सांगण्यात आला. विशाल विमल यांनी बुवाबाबाच्या भूमिकेतून बुवाबाजी, अंधश्रद्धा, अघोरी काळी जादू आदी चमत्कार नाट्यमयरीत्या सादर केले. चिठ्ठीत लिहिलेला मजकूर चिठ्ठी न उघडता विशाल विमल यांनी वाचून दाखविला आणि हे आंतरेंद्रिय शक्तीने शक्य झाल्याचा दावा केला; मात्र त्याला विज्ञानाच्या भूमिकेतून माधुरी गायकवाड यांनी प्रतिउत्तर देत स्वतःही हा प्रयोग करून दाखविला. माधुरी गायकवाड यांनी सर्वच चमत्कारांमागील कार्यकारण भाव, रासायनिक अभिक्रिया, हातचलाखी, विज्ञान समजावून सांगितले.

समोर ठेवलेल्या कोणत्या वस्तूला प्रेक्षकांनी हात लावला हे विशाल विमल यांनी ओळखून दाखविले. खरे तर असे प्रयोग धार्मिक वस्त्र घालून कुण्या बुवाबाबाने केल्यास त्या चमत्कारला लगेच नमस्कार केला जातो; मात्र विशाल विमल यांनी हा प्रयोग सादर करताना प्रेक्षकांमध्ये एक कार्यकर्ता बसलेला होता. त्याने ठरविल्याप्रमाणे इशारे केल्याने प्रेक्षकांनी हात लावलेली वस्तू विशाल विमल यांनी उचलून दाखवली. वात नसणाऱ्या दिव्यात पाणी टाकले की, तो मंत्राने प्रज्वलित होतो, असे भासविले जाते; मात्र दिव्यात विशाल विमल यांनी पाणी आणि कॅल्शिअम कार्बाईड टाकल्याने त्यातून निर्माण होणारा वायू पेट घेत असल्याने तो दिवा प्रज्वलित झाल्याचे सांगितले. अशा प्रकारे विविध प्रयोग सादर करून विद्यार्थ्यांना चमत्कारामागील विज्ञान कार्यकर्ते सांगतात. शेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्री. आंनद पिंगळे यांनी आयोजकांचे आभार मानले.

दैवीशक्ती अंगी असल्याचे सांगून आजही समाजात सर्वधर्मीय बुवाबाबा हे चमत्कार केल्याचे दावे करतात. यातून लोकांच्या मानसिक, शारीरिक शोषणासह आर्थिक आणि वेळेचेही नुकसान होते. चमत्कार घडण्यामागे कोणतीही दैवी शक्ती नसून हातचलाखी आणि रासायनिक पदार्थांच्या वापरामुळे चमत्कार घडतात. चमत्कारामागील वैज्ञानिक दृष्टिकोन-कार्यकारण भाव विज्ञान दिनानिमित्त आम्ही रुजवितो.

  • विशाल विमल, राज्य पदाधिकारी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा