मुंबई, 15 फेब्रुवारी 2022: BSE सेन्सेक्स सोमवारी 1,747.08 अंकांनी (3 टक्के) घसरून 56,405.08 वर बंद झाला. NSE निफ्टी 531.95 अंकांनी (3.06 टक्के) घसरून 16,842.80 वर बंद झाला. देशांतर्गत शेअर बाजारात जवळपास वर्षभरातील ही सर्वात मोठी घसरण होती. यापूर्वी 26 फेब्रुवारी 2021 रोजी सेन्सेक्स 1,940 अंकांनी घसरला होता आणि निफ्टी 568 अंकांनी घसरला होता. गेल्या दोन सत्रात शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यानं गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. गेल्या दोन सत्रांमध्ये विक्रीमुळं गुंतवणूकदारांचं 12.43 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय. बीएसईचे एकत्रित मार्केट कॅप गुरुवारी 267.81 लाख कोटी रुपये होते, जे सोमवारी 255.38 लाख कोटी रुपयांवर घसरले.
या तीन कारणांमुळं झाली ही मोठी घसरण
- रशिया-युक्रेन वाद: हेम सिक्युरिटीज हेड – पीएमएस मोहित निगम या तीव्र घसरणीबद्दल म्हणाले, “युक्रेन-रशिया यांच्यातील वाढता तणाव, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि दशकातील सर्वोच्च चलनवाढ यामुळं अमेरिकेला त्रास झालाय. फेडच्या व्याजदरात वाढ होण्याच्या अपेक्षेमुळं अल्प काळासाठी बाजारात नकारात्मक भावना निर्माण झाली. परंतु आमचा विश्वास आहे की सध्याची घसरण युक्रेनच्या संकटामुळं दिसून येत आहे. हा वाद निवळला की पुन्हा बाजारात रॅली बघू शकता.”
- एबीजी शिपयार्ड फसवणूक: सीबीआयने गेल्या आठवड्यात या प्रकरणी एफआयआर नोंदवला. ही देशातील सर्वात मोठी बँकिंग फसवणूक आहे. युक्रेन संकट तसेच एबीजी शिपयार्ड फसवणुकीशी संबंधित घडामोडींमुळं शेअर बाजारात आणखी घसरण झाली. या फसवणुकीमुळं खाजगी क्षेत्रातील आणि PSU बँकांच्या शेअर्सवर परिणाम झाला. या घोटाळ्यांमुळं सोमवारी निफ्टी बँक 4.18 टक्क्यांनी घसरली.
- FPIs काढणं: विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) फेब्रुवारीच्या पहिल्या 11 दिवसांत 14,935 कोटी रुपये काढले आहेत. अशा प्रकारे, सलग चौथ्या महिन्यात एफपीआय विक्रेते राहिले आहेत. त्याचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावरही दिसून येत आहे. FPI गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर बाजारातील भावना प्रतिबिंबित करते. निफ्टीचे सर्व 50 शेअर घसरले गेल्या दोन सत्रांमध्ये निफ्टी निर्देशांकातील सर्व 50 शेअर लाल चिन्हासह बंद झाले. निर्देशांकावरील मागील दोन सत्रांमध्ये एचडीएफसी लाइफ इन्शुरन्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 8.04 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यापाठोपाठ एचडीएफसी (7.50 टक्के), स्टेट बँक ऑफ इंडिया (7.46 टक्के) आणि टाटा मोटर्स (7.18 टक्के) यांचा क्रमांक लागतो. यूपीएल, श्री सिमेंट, कोटक महिंद्रा बँक, जेएसडब्ल्यू स्टील, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, टेक महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, अदानी पोर्ट्स, टाटा स्टील आणि मारुती सुझुकी यांचे शेअर पाच टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे