आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीची धाड

मुंबई २१ जून २०२३: महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाल्यापासून ईडी आणि सीबीआयसह इतर केंद्रीय संस्थांचा ससेमीरा राजकीय नेत्यांच्या पाठीमागे लागल्याचे दिसून येत आहे. परवा शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना मणिपूर मध्ये चाललेल्या हिंसाचारावर नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले होते की, ईडी-सीबीआयचे अधिकारी मणिपूर मध्ये पाठवा ते परत येतात का पहा. यानंतर आज महाराष्ट्रात ईडीचा छापा पडला.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीची धाड पडलीय. कोरोना काळातील लाईफलाईन कंपनी घोटाळा प्रकरणी ही धाड टाकण्यात आली. कोरोनाच्या काळात लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीकडून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. कोविड सेंटर आणि वैद्यकीय उपकरण खरेदी कंत्राटामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता, या प्रकरणी ईडी आज चौकशी करत आहे.

दरम्यान राज्य सरकारने कोविड काळात घोटाळा झाल्याच्या संशयावरून, एसआयटी स्थापन करून मुंबई महानगरपालिकेची चौकशी करण्याचा निर्णय नुकताच घेतला. यानंतर उद्धव ठाकरे गटाने मुंबई महानगरपालिकेवरती एक जुलै रोजी मोर्चा काढण्याचे ठरविले आहे. यावरूनही शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये विविध आरोप प्रत्यारोप केले जातायत, आता यावर आणखी काय समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा