मुंबई १४ जून २०२३ : काल शिवसेनेने वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत आकडेवारी मांडताना, महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक लोकांनी पसंती दिल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदासाठी २६.२% लोकांनी पसंती दर्शवली आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २३.४% लोकांनी पसंती दर्शवली आहे. तर महाराष्ट्रात सेना-भाजप सरकारला सर्वाधिक लोकांनी पसंती दील्याचेही जाहिरातीत म्हटले आहे. या सर्व गोष्टींवर, महाराष्ट्राच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खरमरीत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अजित पवार यांनी पञकार परिषदेत सांगितले की, वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत जो सर्व्हे दाखवलाय त्यानुसार एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी लोकांनी सर्वाधिक कौल दिलाय, त्यांना एक नंबर देण्यात आला आहे. मला खूप आनंद वाटला की चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या जनतेला एकनाथ शिंदे हेच पुढे मुख्यमंत्री व्हावे, असे वाटत आहे. इतक्या लोकांचा पाठींबा आहे तर मग तुम्ही स्थानिक स्वराज्य संघटनेच्या निवडणुका का घेत नाहीत? या सरकारला निवडणूक घेण्याची भीती वाटते का? असा उपरोधिक सवाल अजित पवार यांनी विचारला आहे.
राष्ट्रात मोदी, तर महाराष्ट्रात शिंदे या शिवसेनेच्या जाहिरातीवरून राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ निर्माण झालाय. या जाहिरातीवरून विरोधकांनी भाजप-शिवसेनेवर निशाणा साधला. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या जाहिरातीची खिल्ली उडवली आहे. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे किंवा ती जाहिरात देणारे, एवढ्या लवकर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कसे विसरले हे मला काही कळले नाही. कारण मुळातच त्यांनी आम्ही बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या विचारांचे आहोत असे म्हणत शिवसेना पक्ष स्वत:कडे खेचून घेतला. पण त्यांच्या जाहिरातीत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसला नाही. तसेच स्वत:च ठरवून सर्वेक्षण केले. हे सर्वेक्षण कुणी केले? एक्झिट पोल येतात तेव्हा तो सर्व्हे कुणी केला ते सांगितले जाते, असेही अजित पवार म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर