अफगाणिस्तानात उपासमारीचं संकट, लोकं विकत आहेत आपल्या मुली…

काबूल, 28 ऑक्टोंबर 2021: कोरोना, दुष्काळी परिस्थिती आणि तालिबानी राजवटीचा सामना करणाऱ्या अफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.  वर्ल्ड फूड प्रोग्रामने सोमवारी चेतावणी दिली की अफगाणिस्तानच्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्येला किंवा सुमारे 2.5 कोटी लोकांना पुढील महिन्यापासून उपासमारीचा सामना करावा लागू शकतो आणि तो या देशाच्या अनेक भागांमध्ये सुरू झाला आहे.  एएफपीच्या रिपोर्टनुसार, अफगाणिस्तानातील गरीब भागातील लोक आपल्या मुलींची विक्री करत आहेत.
फहिमा नावाच्या महिलेने संवादात सांगितलं की, तिच्या पतीने आपल्या 6 वर्षांच्या आणि दीड वर्षाच्या मुलींना विकलं आहे.  पश्चिम अफगाणिस्तानातील दुष्काळापासून वाचण्यासाठी तिच्या पतीने आपल्या दोन्ही मुलींना लग्नासाठी विकलं म्हणून ती अनेक वेळा रडल्याचं फहिमा म्हणाली.  फहिमाने सांगितलं की, “माझ्या पतीने मला सांगितलं की, जर आपण आपल्या मुली दिल्या नाहीत तर आपण सर्व मरून जाऊ कारण आपल्याकडं खायला काहीच नाही.  एवढ्या पैशासाठी माझ्या मुली विकल्याबद्दल मला खूप वाईट वाटते पण आमच्याकडं पर्याय नाही.”
 अहवालानुसार, फहिमाच्या मोठ्या मुलीची किंमत 3350 डॉलर (सुमारे 2.5 लाख रुपये) होती तर लहान मुलीची किंमत 2800 डॉलर (2.1 लाख) होती.  हे पैसे कुटुंबातील सदस्यांना हप्त्याने दिले जातील.  या मुलींचे पतीही अल्पवयीन आहेत.
 दुसर्‍या अहवालानुसार, पश्चिम अफगाणिस्तानातील एका खेड्यातील एका महिलेने बाकीच्या मुलांची व्यवस्था करण्यासाठी तिची मुलगी 500 डॉलर मध्ये विकली.  लग्नासाठी मुली विकत घेणाऱ्या व्यक्तीने दावा केला की, त्याला आपल्या मुलासाठी मुलगी हवी आहे.  तथापि, या दाव्याची कोणतीही हमी नाही.  त्याने काही दिवस कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी 250 डॉलर दिले आहेत आणि जेव्हा ती चालायला शिकंल तेव्हा बाळाला सोबत घेऊन जाईल.
 ती महिला म्हणाली, “माझी इतर मुलं उपाशी होती म्हणून आम्हाला आमची मुलगी विकावी लागली. मी का दुःखी होणार नाही? ती माझी मुलगी आहे. मला खूप समाधान वाटलं असतं जर मुलीला वाचवता आलं असतं.”
अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडील बाघिस प्रांताची राजधानी काला-ए-नाव दुष्काळाने होरपळत आहे.  गावातील लोकांचं म्हणणं आहे की 2018 मध्ये दुष्काळाच्या काळात अल्पवयीन मुलींची लग्नं होण्याचं प्रमाण वाढलं होतं.  यंदा पावसामुळं पुन्हा एकदा मुली विकण्याच्या घटना वाढल्या आहेत.
फहिमाच्या 25 वर्षीय शेजारी साबेरेहने या भागातील एका कॅम्पमधील एका व्यक्तीकडून कर्ज घेतले आहे.  या व्यक्तीचं म्हणणं आहे की “जर तो कर्जाची परतफेड करू शकला नाही तर तो साबेरेहला तुरुंगात टाकेल.  यामुळं त्यांनी आपल्या चार वर्षांच्या मुलाला विकलं आहे.  माझ्या निर्णयावर मी अजिबात खूश नसून आमच्याकडं खाण्यापिण्याला काहीच नाही, असंच सुरू राहिल्यास आम्हाला आमच्या तीन महिन्यांच्या मुलीलाही विकावं लागू शकतं”, असं साबरेहने सांगितलं.
लोकांची मानसिक स्थिती वाईट होत आहे
फहिमाच्या आणखी एका शेजारी गुल बीबी सांगतात की, “या भागातील अनेक लोक बालविवाहातून मिळणाऱ्या पैशांवर गुजराण करत आहेत.  गुल बीबीने स्वतः तिची एक मुलगी विकली आहे.  गरिबी, उपासमार आणि स्वतःची मुलं विकणं यामुळं या लोकांची मानसिक स्थितीही बिकट झालीय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा