आचार्य अत्रे यांच्या १२५ व्या जयंती वर्षाच्या सांगता समारंभा निमित्त चित्रपट महोत्सव

पुणे ५ ऑगस्ट २०२४ : साहित्यसम्राट आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या १२५ व्या अर्थात शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीवर्षाच्या सांगता समारंभा निमित्त ‘आत्रेय’ मुंबई, राष्ट्रीय फिल्म संग्रहालय,पुणे आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ,पुणे ह्यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ११ ते १३ ऑगस्ट दरम्यान चित्रपट महोत्सव आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव राष्ट्रीय चित्रपट संग्राहलयात करण्यात येणार असून रसिकांसाठी तो विनामुल्य खुला आहे. अशी माहिती ‘आत्रेय’चे राजेंद्र पै यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या तीन दिवसीय महोत्सवाबाबत अधिक माहिती देताना राजेंद्र पै म्हणाले की, रविवार दिनांक ११ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता, राष्ट्रीय चित्रपट संग्राहलयात सिने-नाट्य कलाकार आणि “श्यामची आई ” चित्रपटात श्यामची भूमिका केलेले माधव वझे यांच्या हस्ते “श्यामची आई ” या चित्रपटाने चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. याच दिवशी दुपारी ४ ते ६.३० या वेळेत ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल यांना पं.हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते आत्रेय पुरस्कृत “आर्याय अत्रे “विशेष सन्मान आणि मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

यावेळी ज्येष्ठ नेते उल्हास पवार प्रमुख पाहुणे म्हणून असतील, तर बाबूराव कानडे, विजय कोलते, सुहास बोकील, श्याम भुर्के आणि आप्पासाहेब परचुरे यांचा देखील विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तीन दिवसीय महोत्सवा दरम्यान आचार्य अत्रे यांच्या निवडक पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. तसेच सुहास बोकील हे आचार्य अत्रे यांच्या निवडक छायाचित्रांचे विशेष प्रदर्शन भरवणार आहेत. पुरस्कार वितरण सोहळ्या नंतर ६.३० ते ८ यावेळेत ” महात्मा फुले ” हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. विश्वकर्मा प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि आचार्य अत्रे लिखित “क्रांतिकारकांचे कुलपुरुष”, डिंपल पब्लिकेशन तर्फे प्रकाशित आणि शिरीष पै लिखित “वडिलांच्या सेवेशी “या पुस्तकांचे तसेच मनोरमा प्रकाशनातर्फे प्रकाशित” मी अत्रे बोलतोय”, “हास्य तुषार” या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवार दिनांक १२ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता महात्मा फुले या चित्रपटाच्या पुणे शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांकरिता विशेष शो चे आयोजन करण्यात आले असून त्याच दिवशी संध्याकाळी “ब्रँडि की बॉटोल” (हिंदी) हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. चित्रपट महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता ” श्यामची आई ” आणि संध्याकाळी ६ वाजता ” महात्मा फुले ” या चित्रपटांचे पुर्नप्रक्षेपण करण्यात येणार आहे . तीन दिवसीय महोत्सव, ग्रंथप्रदर्शन आणि छायाचित्र प्रदर्शन हे सर्व कार्यक्रम राष्ट्रीय चित्रपट संग्राहलय आणि प्रांगण परिसरात होणार आहेत.

न्युज अनकट प्रतिनीधी : जयश्री बोकील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा