नवी दिल्ली, १३ जानेवारी २०२३ ; जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. शरद यादव यांची मुलगी शुभशिनी यादव हिने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. शुभशिनीने आपल्या ट्विटमध्ये “पापा नहीं रहे” असे म्हटले आहे. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शरद यादव यांना गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्यांच्यावर दीर्घकाळ उपचार सुरू होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दिवसभर छतरपूर येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
शरद यादव हे जनता दलाच्या स्थापनेनंतर दीर्घकाळ पक्षाचे अध्यक्ष देखील होते. शरद यादव यांचा जन्म १ जुलै १९४७ रोजी मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथील बंदई गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. एका शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या शरद यादव यांनी विद्यार्थी राजकारणातून सुरूवात करत राष्ट्रीय राजकारणात ठसा उमटवला. त्यांनी सात वेळा खासदार म्हणून काम पाहिलेय. तसेच त्यांनी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहार या तीन राज्यांमधून लोकसभेवर खासदार म्हणून काम केले. शरद यादव हे आणीबाणीच्या काळात ते तुरुंगातही गेले होते.
- दिग्ग्जांकडून शोक व्यक्त
दरम्यान, शरद यादव यांच्या निधनाच्या वृत्तानंतर राजकीय विश्वातून शोक व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत दु:ख व्यक्त केले आहे.
श्री.शरद यादव यांच्या निधनाने अतिशय दु:ख झाले. त्यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक कारकिर्दीत त्यांनी स्वत:ला एक खासदार आणि मंत्री म्हणून ओळख मिळवली. डॉ. लोहिया यांच्या आदर्शांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. त्यांच्या सोबतचा संवाद मी कायम स्मरणात ठेवेन. यादव कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे, असे ट्विट करत पंतप्रधानांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आणि शोक व्यक्त केला.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.