पेण, २१ फेब्रुवारी २०२४ : पेण तालुक्यातील ग्रामीण भागातील गावागावात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तसेच भाजपच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा शर्मिला पाटील यांच्या पुढाकाराने हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना शर्मिला पाटील यांनी आपली नारी शक्ती हीच देशातील सर्वात मोठी शक्ती असून आज आपण इथे जशा सर्वजणी एकत्र जमलो आहोत तशाच संघटीत होऊन प्रत्येक काम केले पाहिजे असे सांगितले. यावेळी व्यासपीठावर रायगड जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हा परिषद सदस्या कौसल्या पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा ऍड. निलिमा पाटील यांसह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. पेण तालुक्यातील तांबडशेत, कळवे, जोहे भागातील महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. या हळदीकुंकू समारंभाला शेकडो महिलांनी सहभाग दर्शविला होता. यावेळी महिलांचे औक्षण करून, हळदीकुंकू आणि वाण तसेच भेटवस्तू देऊन महिलांचा मान-सन्मान करण्यात आला.
भाजपच्या महिला मोर्चाच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षा शर्मिला पाटील यांनी महिलांचा आत्मसन्मान वाढवून स्त्री आता फक्त घरात बसून न राहता समाजातील प्रत्येक क्षेत्रात तिने आपला ठसा उमटवला आहे, आपला दबदबा निर्माण केला आहे, केंद्र सरकारसह राज्य सरकारने महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना आणल्या आहेत तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या संरक्षणासाठी नवनवीन कायदे अंमलात आणले आहेत. त्याचा फायदा महिलांना चांगल्या प्रकारे होत आहे. त्यामुळे आता स्त्रियांनी अशाच संघटित, एकत्रित राहून एकमेकींना मदत करून पुढे जायला पाहिजे असे सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : स्वप्नील पाटील