नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड, कांदिवलीच्या भाजी मंडईतील धक्कादायक प्रकार समोर

मुंबई २७ जून २०२३: मुंबईत तीन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. शहरात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. विशेष म्हणजे पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झालेली बघायला मिळत आहे. मुंबईत अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे.त्यामुळे मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागला. पावसाळ्यात होणारा असा त्रास नेहमीचाच असताना मुंबईकरांच्या आरोग्याला धोका पोहोचवणारा आणखी एक प्रकार समोर आला आहे. संबंधित प्रकार अतिशय किळसवाणा आहे. पावसाळ्यात वेगवेगळे साथीचे रोग बळावत असतात. असे असताना मुंबईत भाजी मंडईत घाणेरड्या पाण्याजवळ भाजीपाला विकला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

कांदिवलीमध्ये भाजी मंडईच्या मधोमध पावसाच्या घाणेरड्या पाण्यात भाजी विकल्याचा घृणास्पद व्हिडिओ समोर आला आहे. मुंबईतील कांदिवली पश्चिम येथील लालजी पाडा हिल्डा आंटी शाळेजवळील भाजी मंडईतील, असा घृणास्पद व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून लोक भाजी खाणे बंद करतील. दोन्ही बाजूंच्या भाजी मार्केटच्या मध्यभागी साचलेले हे घाण पाणी, पावसाच्या पाण्याने तुंबलेल्या गटाराचे आहे. नाल्याजवळ एक शौचालय देखील आहे. या पाण्यातून लोक शौचालयात जातात आणि नंतर याच पाण्यातून परत येतात. कधी-कधी शौचालय तुडुंब भरले की त्याचेही पाणी बाहेर पडून या भाजी मंडईच्या मधोमध साचते. या ठिकाणी घाणेरड्या पाण्याच्यावर भाजीचे दुकान लावले आहे आणि खाली काही पिशव्यांमध्ये भाजीपाला बांधून या घाणेरड्या पाण्यात ठेवल्या आहेत.

आशा घाणेरड्या पाण्यात ठेवलेल्या या भाज्या लोकांना विकल्या जाणार आणि त्या खाऊन लोक आजारी पडणार नाहीत का? असा प्रश्न उपस्थित होतोय. या भाजी मंडईवर आणि भाजी मंडईच्या मधोमध साचलेल्या घाण पाण्याकडे ना मुंबई महापालिका, ना स्थानिक लोकप्रतिनिधीचे लक्ष आहे. त्यामुळे ही भाजी खाऊन लोक आजारी पडल्यावर जबाबदार कोण? अशा प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड होताना दिसून येते.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा