मुंबई, दि. २७ जुलै २०२०: देशात आणि राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु आहे. लोकांना पर्यटनासाठी बाहेर निघायला सक्त मनाई आहे. मुंबई आणि पुण्यात तर सर्वाधिक कोरोनाग्रस्त आहेत. त्यामुळे पुणे – मुंबईसारखया मोठ्या शहरांत कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र हे लॉकडाऊन फक्त सामान्य जनतेसाठीच आहे का? असा प्रश्न अनेकांना पडतो. कारण मध्यमवर्गीय लोक रस्त्यावर दिसली कि त्यांच्यावर लॉकडाऊनचे उल्लंघन केले म्हणून कारवाई केली जाते. पण अनेक नेते मंडळी आणि सेलिब्रिटीज हे लॉकडाऊनमध्येही फिरताना दिसतात आणि त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही.
आज राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटरवर काही फोटोज शेअर केले. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह समुद्रकिनाऱ्यावरचे हे फोटोज आहेत. यात एका फोटोमध्ये ते निवांतपणे बसलेले दिसतायत तर दुसऱ्या फोटोमध्ये ते पोलिसांशी संवाद साधत आहेत. हे फोटोज रविवारचे आहेत. मात्र या फोटोजवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. गृहमंत्री अनिल देशमुखांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं कि, – ”रविवारी सायंकाळी काही निवांत क्षण मरीन ड्राईव्हच्या समुद्रकिनारी फेरफटका मारला. आपली मुंबई ही महाराष्ट्राची शान आहेच पण वारसा देखील जपतेय. कोरोनामुळं अल्पविराम बसला तरी आपण पुन्हा नव्याने उठू, दुप्पट गतीने नक्की पुढे जाऊ, असा विश्वास मला वाटतो.”
राज्याचे गृहमंत्री फेरफटका मारण्यासाठी समुद्रकिनारी जाऊ शकतात पण सामान्य माणूस एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात आपल्या गावी जाऊ शकत नाही हे कटू सत्य आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे.