पुणे, ११ जून २०२३: आषाढी वारीच्या पहिल्याच दिवशी एसटी बस आणि पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात सहा वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. पुरंदर तालुक्यातील पुणे-पंढरपूर मार्गावर भोरवाडीफाटा येथे रात्री हा अपघात झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वारकऱ्यांना घेऊन पंढरपूरहून पुण्याकडे निघालेली एसटी बस आणि पुण्याकडून वाल्हेकडे निघालेल्या कोंबड्यांची वाहतूक करणारा पिक अप टेम्पो यांची समोरासमोर जोरदार धडक झाली.
या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात एसटीतील सहा प्रवाशी गंभीर जखमी झाले असून यातील एका प्रवाशांच्या पायाला मार लागून पायाचे हाड मोडले आहे. एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून जखमींना जेजूरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये वारकऱ्यांचा समावेश आहे. हे वारकरी आळंदीकडे पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी निघाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर