मुंबई, ५ जुलै २०२३ : अजित पवार यांनी बंड केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस दोन भागात विभागली आहे. अजित पवार सत्तेत सहभागी झाले असून उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली आहे. त्यांच्यासह ९ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजितदादांच्या या निर्णयामुळे राज्यातील राजकारणातील समीकरणे बदलली आहेत. मात्र, कोणत्या पवारांकडे किती आमदार आहेत याचे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
अजित पवार यांनी आज भुजबळ सिटीत मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याला येण्यासाठी सर्व आमदार आणि खासदारांना व्हीप बजावण्यात आला आहे. तर शरद पवार यांनीही राष्ट्रवादीच्या बैठकीचे आयोजन केले आहे. ही बैठक दुपारी १ वाजता वाय बी चव्हाण सेंटर येथे होणार आहे. या बैठकीला येण्यासाठी सर्व आमदार आणि खासदारांना व्हीप बजावण्यात आला आहे. त्याचबरोबर स्वतः शरद पवार आणि सुप्रिया सुळे, आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी फोनवर बोलण्याचे समजते. त्यामुळे आजच्या दोन्ही गटाच्या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पक्षाची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला आमदार आणि खासदारांना बोलावण्यात आले आहे. तसा व्हीपही जारी करण्यात आला आहे. पवारांनी बोलावलेल्या या बैठकीला २० ते २५ आमदार उपस्थित राहतील असे राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटत आहे. शरद पवारांनी स्वतः संपर्क साधल्याने तेवढ्या आमदारांचा आकडा जमेल, असा विश्वास या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचे निवेदन आमच्याकडे अजून आलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधीमंडळ पक्ष म्हणून अजूनही एकच आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केली आहे. ते माध्यमांशी संवाद साधत होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर