अमरावती, २४ ऑक्टोंबर २०२२: अमरावतीमध्ये अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर येथील अपक्ष आमदार बच्चू कडू आणि अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्यातील वाद वरचेवर रंगत आहे. रवी राणा यांनी केलेल्या आरोपांविरोधात बच्चू कडू यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे.
रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता. या आरोपानंतर बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. याप्रकरणी बच्चू कडू यांनी थेट राजापेठ पोलीस ठाण्यात रवी राणाविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच रवी राणा यांनी केलेले आरोप सिद्ध झाले तर त्यांच्या घरी जाऊन भांडी घासेन, असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. १ तारखेपर्यंत आरोप सिद्ध करावा, अन्यथा आपण कठोर कायदेशीर पावलं उचलणार असल्याचे संकेतही बच्चू कडू यांनी दिले आहेत.
बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं नसून सेटलमेंट केल्याचा आरोप राणांनी केला. तसेच बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे.
अमरावतीमध्ये सध्या बच्चू कडू विरुद्ध राणा असा वाद पेटलेला आहे. दरम्यान, या दोघांच्या भांडणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यस्थी करणार असल्याची माहिती आहे. मंत्री दीपक केसरकर यांनी काल याबाबत स्पष्टीकरण दिलंय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या वादाशी भाजपचा संबंध काय, असा प्रश्न उपस्थित केला.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे