पुणे, २४ ऑगस्ट २०२१: पुणे शहरात वनाज ते जिल्हा न्यायालया दरम्यान मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीस काही प्रमाणात अडथळा निर्माण होत होता. त्यात आता आणखीन भर पडण्याची शक्यता आहे. पुणे शहरातील सततचा वर्दळीचा असलेला संभाजी महाराज पूल म्हणजेच लकडी पूल मेट्रोच्या कामानिमित्त २४ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर दरम्यान रात्री ११ ते पहाटे ६ वाजेदरम्यान वाहतुकीसाठी बंद असणार आहे. अशी माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे.
मेट्रोच्या कामासाठी छत्रपती संभाजी महाराज पुलादरम्यान (लकडी पुल) पिलरवर गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या २४ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर दरम्यान पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक रात्री ११ ते सकाळी ६ वाजेदरम्यान वाहतूकीसाठी बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
पर्यायी मार्ग देण्यात आला –
त्यामुळे टिळक चौकातून खंडोजीबाबा चौकाकडे जाण्यासाठी नागरिकांनी वाहतूक विभागाने पर्यायी रस्ता दिला आहे. तो मार्ग – टिळक चौक, केळकर रोड, कासट कॉर्नर, माती गणपती चौक, नारायण पेठ पोलीस चौकी, केसरी वाडा, रमणबाग शाळा चौक डावीकडून वळून वर्तक बाग, कॉसमॉस बँक चौक, बालगंधर्व पुलावरून डावीकडून वळून जंगली महाराज रोडने खंडोजी बाबा चौक, तर केळकर रोडने ओंकारेश्वर मंदिर मार्गाने वाहने जाऊ शकतात.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे