दोन दिवसात ४० हजार ६९० जणांनी केला मेट्रोतुन प्रवास, मेट्रो पुणेकरांच्या पसंतीस उतरतिये?

पुणे, ३ ऑगस्ट २०२३ : १ ऑगस्ट रोजी पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रूबी हॉल या दोन मार्गांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यानंतर पुणे मेट्रो सर्वसामान्यांसाठी सुरु झाली. मेट्रो पुणेकरांच्या पसंतीस उतरल्याचे चित्र दिसत आहे. पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन केल्यानंतर मंगळवारी सायंकाळी पाचवाजेपासून मेट्रो सर्वसामान्यांसाठी सुरु झाली. मंगळवार आणि बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ४० हजार ६९० जणांनी मेट्रोतुन प्रवास केला. यामध्ये विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांचा समावेश आहे.

मंगळवारी मेट्रो सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आली. त्यानंतर पहिल्या दिवशी रात्री ११ वाजेपर्यंत वनाज ते रुबीहॉल मार्गावर ७ हजार ४५६ जणांनी प्रवास केला. सिव्हिल कोर्ट ते पिंपरी-चिंचवड मार्गावरुन ५,४६२ जणांनी प्रवासाचा आनंद घेतला. बुधवारी दोन्ही मार्गांवर सुमारे २७ हजार ७७२ जणांनी सायंकाळी सात वाजेपर्यंत प्रवास केला आहे. म्हणजेच पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी मेट्रोच्या प्रवाशांमध्ये दुप्पट वाढ झालीय.

मेट्रोमुळे पुणे शहरातील नागरिकरांना आणखी एक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मिळाली आहे. या वाहतूक व्यवस्थेमध्ये वाहतूक कोंडीची कटकट नाही. प्रदूषण नाही. वेगवान प्रवास कमी खर्चात होत आहे. यामुळे वेळेची आणि पैशांची बचत होत आहे. तसेच विद्यार्थ्यांना तिकीट दरात ३०% सवलत दिली गेली आहे. यामुळे पुणेकरांच्या पसंतीस मेट्रो उतरली असल्याचे दिसून येत आहे. मेट्रोने शनिवारी आणि रविवारी प्रवास करताना सर्वांना ३०% सवलत मिळणार आहे. यामुळे शनिवार आणि रविवारी मेट्रोतील प्रवाशांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मेट्रो सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत सुरु असणार आहे. गर्दीच्या वेळेत दर १० मिनिटांनी मेट्रोच्या फेऱ्या असतील तर १२ ते ४ या वेळेत दर १५ मिनिटांनी मेट्रो उपलब्ध असणार आहेत. वनाझ ते पिंपरी चिंचवड मार्गावर ३५ रुपये तिकीट दर आहे. पिंपरी चिंचवड ते सिव्हिल कोर्टसाठी ३० रुपये दर आहे. पिंपरी चिंचवड ते पुणे स्टेशनसाठी ३० रुपये तिकीट दर असून हा प्रवास २५ ते ३० मिनिटांमध्ये होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा