ठाणे १७ जून २०२३ : मुंबईसह महाराष्ट्रात महिला सुरक्षित नसल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. आता मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच महिला सुरक्षित नसल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. ठाकरे गटाच्या महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ यांच्यावर ठाण्यात शाई-फेक करण्यात आली. तसेच पोळ यांना मारहाणही करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास कळवा येथे घडली आहे. या प्रकरणी अयोध्या पोळ यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केलीे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात जाहीर कार्यक्रमामध्ये एका महिलेवर शाईफेक करण्यात आल्यामुळे, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर वर आला आहे.
या घटनेनंतर ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांनी संताप व्यक्त करत गंभीर आरोपही केले आहेत. ठाण्यातील कळवा येथे ठाकरे गटाचा कार्यक्रम असल्याचा बनाव करून, मला या कार्यक्रमाला बोलावण्यात आले होते. मला जाणूनबुजून या कार्यक्रमाला बोलावण्यात आले. इथे आल्यावर हा कार्यक्रम आपल्या गटाचा नसल्याची मला शंका आली, पण कार्यक्रमातून निघणे योग्य नसल्याने मी थांबले.
मला महापुरुषांच्या प्रतिमांना हार घालण्यास सांगण्यात आले. मी महापुरुषांना हार घातले. त्यावेळी एक महिला आली आणि तिने मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याचा माझ्यावर आरोप केला. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्या ऐकायला तयारच नव्हत्या. तेवढ्यात माझ्या अंगावर शाईफेक करण्यात आली तसेच मला मारहाणही करण्यात आली, असे अयोध्या पोळ म्हणाल्या.
हे सर्व षडयंत्र होते. कार्यक्रमाला बोलावून शाईफेक, मारहाण करण्याचा पूर्वनियोजित षडयंत्राचा भाग होता. मी सातत्याने सोशल मीडियावर ठाकरे गटाची बाजू मांडत असल्याने मला टार्गेट करण्यात आलय, पण आम्ही अशा हल्ल्यांना भीक घालत नाही. आम्ही आमचे काम करतच राहणार, असेही अयोध्या पोळ यांनी स्पष्ट केले.
अयोध्या पोळ यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर ठाकरे गटाने तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. ठाकरे गटाचे नेते केदार दिघे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. पोळ यांच्यावर झालेली शाईफेक आणि मारहाणाची घटना दुर्दैवी असुन त्यांना षडयंत्र करून बोलावले गेले. अयोध्या पोळ यांनी कळवा पोलीस ठाण्यात तशी तक्रार दिली आहे. पोलीस रितसर चौकशी करतील याची आम्हाला खात्री आहे. पोलिसांनी त्वरीत कारवाई केली नाही तर आम्हाला काय करायचे ते बघू, असा सूचक इशारा केदार दिघे यांनी दिला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर