आशिया करंडकमध्ये भारत-पाकिस्तान तीन वेळा भिडणार!

पुणे, ५ जानेवारी २०२३ : संपूर्ण जग भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांची वाट पाहत आहे. अलीकडेच हे संघ दोनदा आशिया करंडकमध्ये भिडले आणि २०२२ च्या टी-२० विश्वकरंडकातही या दोघांमध्ये संघर्ष झाला. आता पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान लढत निश्चित झाली आहे. हे दोन्ही संघ आशिया कप २०२३ मध्ये भिडणार आहेत. गुरुवारी (ता. पाच) आशियाई क्रिकेट परिषदेने मोठी घोषणा करताना स्पर्धेचे स्वरूप आणि गट जाहीर केले. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी गुरुवारी (ता. पाच) ट्विट केले, की आशिया करंडक स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होणार असून, या संघांची दोन गटांत विभागणी केली जाईल. विशेष म्हणजे भारत आणि पाकिस्तानचे संघ एकाच गटात आहेत.

आशिया करंडक स्पर्धा सप्टेंबरमध्ये होणार असून, एकूण ६ संघ या स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. एसीसीने तयार केलेल्या फॉर्मेटनुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना निश्चित आहे.

भारत आणि पाकिस्तानला गट १ मध्ये ठेवण्यात आले आहे. श्रीलंकेचा संघही या गटात आहे. दुसरीकडे, गट २ मध्ये अफगाणिस्तान, बांगलादेशचा संघ असून, साखळी टप्प्यात एकूण ६ सामने खेळवले जातील. त्याचबरोबर साखळी फेरीनंतर सुपर-४ फेरी खेळवली जाईल. याचा अर्थ भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका यापैकी कोणत्याही एकाचा प्रवास ग्रुप स्टेजमध्येच संपेल. सुपर- ४ फेरीत एकूण ६ सामने खेळले जातील आणि त्यानंतर अंतिम दोन संघ ठरवले जातील. म्हणजेच आशिया करंडकमध्ये एकूण १३ सामने खेळवले जाणार आहेत.

आशिया करंडटमध्ये भारत-पाकिस्तानचे तीन सामने पाहायला मिळू शकतात. साखळी फेरीत दोघांची स्पर्धा निश्चित आहे. यानंतर, दोन्ही संघ सुपर-४ फेरीतही भिडू शकतात. गुणांच्या बाबतीत दोन्ही संघ अव्वल २ मध्ये राहिले तर अंतिम सामनाही दोघांमध्ये पाहायला मिळू शकतो.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा