जेनेवा, २२ सप्टेंबर २०२०: संयुक्त मानवाधिकार परिषदेच्या ४५ व्या अधिवेशनात सोमवारी भारतानं पाकिस्तानवर टीका केली. जिनेव्हा येथील भारताच्या कायमस्वरुपी मिशनचे पहिले सचिव, सेंथिल कुमार म्हणाले की, “पाकिस्ताननं भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये चुकीचं वक्तव्य करणं टाळलं पाहिजे. खोटी माहिती आणि राजकीय प्रचाराद्वारे पाकिस्ताननं पुन्हा एकदा परिषदेचे लक्ष वळविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटत नाही. इतर देशांच्या मुद्द्यांमध्ये लक्ष घालण्यापेक्षा पाकिस्ताननं आपल्या देशातील समस्यांकडं लक्ष द्यावं.”
सचिव सेन्थिल कुमार म्हणाले की, “पाकिस्तानमधील मानवाधिकार रक्षणकर्त्यांना धमकावले जात आहे, धमकी दिली जात आहे. मानवाधिकार कार्यकर्त्यांना छळ करून त्यांचे अपहरण केलं जात आहे. पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांविरोधात हिंसाचार होत आहे. विशेषत: महिला आणि अल्पसंख्याकांना सतत लक्ष्य केलं जात आहे. पाकिस्तानमध्ये मुली, बहिणी आणि मातांवर अत्याचार केले जातायेत.”
राईट टू रिप्लाय दरम्यान सेंथिल कुमार म्हणाले की, “पाकिस्तानात मानवाधिकारांचं उल्लंघन होत आहे. परंतु, ते भारतावर निराधार आरोप करण्यात व्यस्त आहेत. विशेषतः ईश्वराविषयी किंवा पवित्र गोष्टींविषयी निंदानालस्ती केल्यास पाकिस्तानमध्ये चिंताजनक स्थिती आहे. यामुळे अश्या व्यक्तींच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. कुमार म्हणाले की, केवळ १२ दिवसांपूर्वी ओएचसीएचआरनं आपल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानमध्ये ईश्वरनिंदा प्रकरणांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनांवर गंभीर चिंता व्यक्त केली.”
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे