भारताची परकीय चलनाची गंगाजळी दोन वर्षांच्या नीचांकावर

नवी दिल्ली, २९ ऑक्टोंबर २०२२: गेल्या काही काळापासून रुपयाच्या मूल्यामध्ये सातत्यानं घट होताना दिसतेय. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ही एक चिंतेची बाब बनली होती. आता याचा परिणाम भारताच्या परकीय चलन साठ्यावर होताना देखील दिसतोय. देशातील परकीय चलनाच्या गंगाजळीत मोठी घट झालीय. रिझर्व्ह बँकेनं शुक्रवारी ही आकडेवारी जाहीर केली. २१ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा ३.८४७ अब्ज डॉलरने घसरून ३५४.५२ अब्ज डॉलर झालाय. मागील अहवाल आठवड्यात एकूण साठा ४.५० अब्ज युएस डॉलरने घसरून ५२८.३७ बिलियन युएस डॉलर झाला. गेल्या अनेक महिन्यांपासून परकीय चलनाच्या साठ्यात घट झालीय. आता तो दोन वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचलाय.

जुलै २०२० पासून देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात सर्वात मोठी घट नोंदवली गेलीय. भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात एका वर्षात ११६ अब्ज डॉलरची घट झालीय. एक वर्षापूर्वी ऑक्टोबर २०२१ मध्ये देशाच्या परकीय चलन साठ्याने ६४५ अब्ज डॉलरचा उच्चांक गाठला होता. देशाच्या चलन साठ्यात घसरण होण्याचं मुख्य कारण रुपयाची घसरण रोखण्याचा प्रयत्न असल्याचं मानलं जातंय. केंद्रीय बँकेला सध्या चलन साठ्यातून मदत मिळत आहे.

सोन्याचा साठा ३७,२०६ अब्ज डॉलर शिल्लक

शुक्रवारी रिझर्व्ह बँकेनं साप्ताहिक आकडेवारी जाहीर केली. २१ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन मालमत्ता (FCA), चलन साठ्याचा एक महत्त्वाचा घटक मानला जाणारा, ३.५९३ अब्ज डॉलरने घसरून ४६५.०७५ अब्ज डॉलर झालाय. मूल्याच्या दृष्टीनं देशातील सोन्याचा साठा २४७ कोटी डॉलरने घसरून ३७,२०६ अब्ज डॉलर झालाय. मध्यवर्ती बँकेनं सांगितलं की स्पेशल ड्रॉइंग राइट्स (SDR) ७० लाखांनी वाढून १७.४४ अब्ज झालेत.

रुपयाची घसरण थांबवण्यासाठी करावी लागतीय डॉलरची विक्री

परकीय चलन मालमत्तेमध्ये परकीय चलनाच्या साठ्यामध्ये असलेल्या युरो, पौंड आणि येन यांसारख्या इतर चलनांमधील अवमूल्यनाचा समावेश होतो. सेंट्रल बँक डेटा दर्शविते की IMF मधील देशाची रिजर्व पॉजिशन अहवाल आठवड्यात १४ मिलियन डॉलरने घसरून ४.७९९ अब्ज डॉलर झालीय. अलीकडच्या आठवड्यात रुपयानं डॉलरच्या तुलनेत ८३.२९ ही विक्रमी नीचांकी पातळी गाठली होती. परिणामी रुपयाची घसरण थांबवण्यासाठी आरबीआयला डॉलर्स विकावे लागत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा