मराठा आंदोलन चिघळवण्यासाठी मंत्रालयातून अदृश्य फोन, संजय राऊत यांचा आरोप

मुंबई, ३ सप्टेंबर २०२३ : जालन्यात मराठा समाजाच्या आंदोलनावर लाठीमार झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. जालन्यातील या घटनेचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. दरम्यान, इंडिया बैठकीवरुन लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी लाठीचार्जचे आदेश देण्यात आले. मराठा समाजाचे आंदोलन चिघळवण्यासाठी मंत्रालयातून अदृश्य फोन आल्याचा दावा देखील ठाकरे गटांचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

राऊत म्हणाले की, जालन्यातील आंदोलन चिघळण्यामागे सरकारचा हात आहे. मराठा समाजाचं आंदोलन शांततेने सुरू होते. आंदोलन चिघळण्यासाठी मंत्रालयातून अदृश्य फोन आला आणि सरकारच्या आदेशावरून हा लाठीचार्ज झाल्याचे ते म्हणाले. आजपर्यंत अनेक मोर्चे शांततेच्या मार्गाने झालेत, आतापर्यंत अशी घटना राज्यात कधीच झाली नाही. मग महाराष्ट्रात ही वेळ का आली? असा प्रश्न देखील खासदार राऊत यांनी उपस्थित केला आहे.

आम्ही उद्धव ठाकरेंसह येथील मराठा आंदोलकांची भेट घेतली. पोलिसांना बाहेर ठेवून आम्ही जालन्यात गेलो. आंदोलक पोलिसांना गावात येऊ देत नाहीत. लाठीचार्जचा आदेश देण्यामागे कोणाचा हात? हे शोधून काढणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाला न्याय मिळावा ही शिवसेनेचीही भूमिका आहे. आम्ही सर्व पक्ष यासाठी सरकारला सहकार्य करु. सरकारने मराठा समाजाला न्याय देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा