मुंबई, ७ ऑगस्ट २०२३ : चंद्रयान-३ ने ५ ऑगस्ट ला महत्वाचा टप्पा पार करत चंद्राच्या कक्षेत पदार्पण केले आहे. या चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर आता चंद्रयान-३ ने चंद्राच्या पृष्ठभागाची मनमोहक छायाचित्रे काढली असून इस्रोने रात्री ती प्रसिद्ध केली आहेत. भारताचे चंद्रयान-३ हे ५ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेशकर्ते झाले होते. भारताने १४ जुलै रोजी चंद्रयान-३ चे आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथून रॉकेटद्वारे प्रक्षेपण केले आहे. येत्या २३ ऑगस्ट रोजी प्रत्यक्षात चंद्रयान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे.
भारताच्या चंद्रयान- ३ ने आकाशाच्या दिशेने झेप घेतल्यावर आतापर्यंत पृथ्वी चंद्रादरम्यानचे दोन तृतीयांश अंतर पार केले आहे. पृथ्वीच्या प्रदक्षिणा केल्यानंतर चंद्रयानाचा चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश घडविण्यात आल्याचे भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने म्हटले. आता चंद्राच्या कक्षेत शिरल्यानंतर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या क्षेत्राचा अनुभव चंद्रयानाला होत असल्याचा संदेश इस्रोने जारी केला होता. चंद्राच्या कक्षेत गेल्यानंतर चंद्रयानाने चंद्राची काही छायाचित्रे काढली आहेत. ही छायाचित्रे इस्रोने ट्वीटरवर शेअर केली आहेत.
चंद्रयानाला चंद्राच्या कक्षेत गेल्यानंतर रविवारी रात्री अकरा वाजता त्याचे कक्षा कमी करण्याचे प्रचालन केले जाणार आहे. त्यानंतर चंद्राच्या प्रदक्षिणा घालत चंदयान चंद्राच्या जवळजवळ जात २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लॅंडींगचा प्रयत्न करणार आहे. हा प्रयत्न यशस्वी झाल्यावर चंद्रावर सॉफ्ट लॅंडींग करणारा अमेरिका, रशिया, चीन नंतर भारत चौथा देश ठरणार आहे.
भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडींग करणारा जगातला पहिला देश ठरणार आहे. या चंद्राच्या दक्षिण पोलवर आतापर्यंत कोणत्याच देशाने लॅंडींग करण्याचे धाडस दाखविलेले नाही. कारण हा भाग नेहमीच काळोखात असून येथील तापमान अतिशीत आहे. येथे यान विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर