बारामती, २४ जानेवारी २०२४ : महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या मान्यतेने डी. जे. क्रिकेट ॲकॅडमीच्या वतीने बारामती येथे आंतर उद्योग क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला होता. यामध्ये बारामतीच्या साहीबा फॅब्रीकेटर्सचा आठ गडी राखून पराभव करत जेजुरी उद्योजक संघाच्या ‘कडेपठार किंग्ज’ ने विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत कडेपठार किंग्जचा अष्टपैलु महेश म्हस्के यास ‘मालिकावीर’ तर वेगवान गोलंदाज निखील कदम यास ‘सर्वोत्क्रुष्ट गोलंदाज’ म्हणुन गौरविण्यात आले. ग्रामीण भागातील उदयोन्मुख खेळाडूंना उद्योग जगताशी जोडून क्रिकेटचा प्रसार व्हावा या हेतूने बारामतीच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयमवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बारामती ॲग्रो, महावितरण, डायनामिक्स डेअरी, पॅसिफीक ॲग्रो, साहीबा फॅब्रीकेटर्स हे बारामतीचे पाच तर जेजुरी औद्योगिक वसाहतीतील उद्योजक संघाचा ‘कडेपठार किंग्ज’ हा एकमेव संघ सहभागी झाला होता. कडेपठार किंग्जने साखळी सामन्यांत चार सामने जिंकत उपांत्य फेरीत सहज प्रवेश केला. उपांत्य सामन्यात ‘महावितरण’ संघाचा पाच गडी राखून सहज पराभव करून अंतिम फेरी गाठली.
सहभागी झालेल्या सर्व संघामध्ये अटीतटीचा सामना रंगला होता आणि अखेर कडेपठार किंग्ज या संघाचा विजय झाला. सदर सामना बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. तसेच या संघाला जेजुरी उद्योजक संघाचे अध्यक्ष डाॅ. रामदास कुटे, कार्याध्यक्ष रविन्द्र जोशी, उपाध्यक्ष पांडुरंग सोनवणे, सचिव राजेश पाटील आणि आशिष कदम यांचे मार्गदर्शन लाभले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे