नवी दिल्ली: जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटना जेएनयूएसयूची अध्यक्ष आयशी घोष हिच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोरांचे चेहरे झाकलेले होते. डाव्या संघटनेने अभाविपवर या हल्ल्याचा आरोप केला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या घोषचा चेहरा रक्तबंबाळ झाला असून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. डाव्यांनी या हल्ल्या केल्याचा संशय अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने व्यक्त केला आहे.
दरम्यान विद्यार्थ्यांच्या दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीनंतर जेएनयूचे गेट बंद करण्यात आले. या घटनेनंतर जेएनयू विद्यापीठात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
याबाबत आयषी घोष म्हणाली, ‘माझ्यावर अत्यंत क्रूर पद्धतीने हल्ला करण्यात आला आहे. हल्ला करणाऱ्या व्यक्तींनी मास्क घातले होते. माझ्या नाकातोंडातून रक्त येत आहे. सध्या मी बोलण्याच्या स्थितीत नाही’, असं म्हटलं आहे.
या घटनेसंदर्भात जेएनयू प्रशासनाने सांगितले की, लाठीमार करणाऱ्या अज्ञातांनी चेहऱ्याला मास्क लावून विद्यापीठाच्या आवारात फिरत होते. याचा अज्ञातांनी मालमत्तेचे नुकसान केले आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. त्याचवेळी दिल्ली पोलिसांनी सांगितले की, दोन दिवसांपासून दोन्ही गटात तणाव आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ प्रशासनाच्या विनंतीवरून पोलिस कॅम्पसमध्ये दाखल झाले आहेत.
या प्रकरणाची गृहमंत्री अमित शाह यांनी दखल घेतली असून दिल्ली पोलिस आयुक्तांकडून या प्रकरणाची त्यांनी माहिती घेतली. सोबतच या प्रकरणाची आयजी स्तराच्या अधिकाऱ्याकडून चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.