कराडचा वेदांत नांगरे अमेरिकेत बनला सर्वात तरुण भारतीय अल्ट्रामॅन

कराड, २९ मार्च २०२३: नुकत्याच अमेरिकेतील एरिझोना राज्यातील फिनिक्स येथे पार पडलेल्या अल्ट्रामॅन स्पर्धेत कराडच्या वेदांत अभय नांगरे (वय २२) याने सहभाग घेत ही स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली. सर्वात कमी वयाचा अल्ट्रामॅन म्हणून त्याला सन्मानित करण्यात आलं. सात देशातील २१ स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यापैकी १६ स्पर्धकांनी ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली. यावेळी स्पर्धेत वेदांत हा एकटाच भारताचं प्रतिनिधित्व करत होता. अमेरिकेतील अल्ट्रामॅन स्पर्धेत तरुण भारतीय अल्ट्रामॅन बनण्याचा मान वेदांतला मिळालाय.

ही तीन दिवसांची खडतर अशी ट्रायथलॉन स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी १० किलोमीटर पोहणं व १५० किलोमीटर सायकलिंग करायची असते. दुसऱ्या दिवशी २७५ किलोमीटर सायकलिंग करायची व तिसऱ्या दिवशी ८४ किलोमीटर रनिंग करायचे असते. प्रत्येक दिवसाचं अंतर स्पर्धकाला १२ तासांच्या आत पूर्ण करायचं असतं. वेदांतला हे अंतर पार करण्यासाठी तीन दिवसांत एकूण ३३ तास ४६ मिनिटं लागली.

अल्ट्रामॅन म्हणून सन्मानित झाल्यावर खासदार श्रीनिवास पाटील, सांरग पाटील यांनी वेदांतचं फोनवरून अभिनंदन केलं. तसेच अनेक भारतातील मित्र, नातेवाईक तसेच अमेरिकेतील भारतीयांनी वेदांतचं विशेष कौतुक केलं. अमेरिकेतील फिनिक्स मराठी मंडळाने त्याची विशेष मुलाखत घेवून त्याचा गौरव केला. भारतामधून अमेरिकेत येवून ही कठीण स्पर्धा यशस्वी केल्यानं आम्हाला भारतीय म्हणून वेदांतचा खूप अभिमान आहे, अशा भावना येथे अनेकांनी व्यक्त केल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा