धक्कादायक प्रकार! मध्यप्रदेशातील पन्नाच्या जंगलात वाघाला फासावर लटकावले; देशातील पहिलीच घटना

भोपाळ, ८ डिसेंबर २०२२ : पन्नाच्या जंगलात एक भयानक घटना घडली. एका वाघाला थेट फासावर लटकाविण्यात आले. शिकाऱ्यांनी हे कृत्य केले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वाघाचा मृतदेह झाडावर लटकत असल्याचे दृश्य पाहून वन अधिकाऱ्यांनाही कळवळून आले.

हे सर्व कृत्य शिकाऱ्यांनी अवयवांच्या तस्करीसाठी केले असावे, असा वन अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. पन्नाच्या जंगलातून २००९ मध्येच वाघ नामशेष झाले होते. वाघांच्या संवर्धनासाठी टायगर रिलोकेशन ही विशेष मोहीम येथे सुरू करण्यात आली होती. या मोहिमेचे यश म्हणून आता येथील वाघांची संख्या वाढली असून, ती सुमारे ७५ झाली आहे.

टायगर स्टेट म्हणून ओळख असलेल्या मध्यप्रदेशात आता वाघ सुरक्षित नाहीत, हे या घटनेने पुन्हा सिद्ध झाले आहे. शिकाऱ्यांनी आधी वाघाला मारले आणि नंंतर दोरीने झाडावर लटकावले असावे. एखाद्या जंगलात वाघ असा फासावर लटकावलेला असणे, ही देशातील पहिलीच घटना असावी.

मृत वाघ नर असून, तो दोन वर्षांचा होता. या घटनेने पन्नातील व्याघ्रसंवर्घन मोहिमेला गालबोट लागले आहे. उत्तरीय तपासणीनंतर वाघावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, त्यांनी तातडीने बैठक बोलावून आधिकाऱ्यांना चागलेच धारेवर धरले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा