महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगच्या परीक्षेत मार्डीच्या कोमल सावंतने उमटविला ठसा

सातारा, १ डिसेंबर २०२२ : सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील महादेवाच्या डोंगररांगेच्या कुशीत वसलेलं मार्डी नावाचे एक गाव आणि त्या मार्डी गावामध्ये गवंडी काम करीत आर्थिक परिस्थितीवर मात करीत आपला आगळावेगळा ठसा उमटवत असतानाच सुसंस्कृत वडीलकीचं नातं जपत मुलीला उच्चशिक्षित केलं. अन् ती मुलगी- कोमल अंकुश सावंत हिनेही वडिलांचा विश्वास सार्थ ठरवीत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या सहायक कक्ष अधिकारीपदी महाराष्ट्र राज्यातून अनुसूचित जाती प्रवर्गातून मुलींमध्ये दुसरा क्रमांक, तर राज्य कर निरीक्षकपदी चौथा क्रमांक प्राप्त केला आहे.

दुष्काळी पट्ट्यातील महादेवाच्या डोंगररांगेत असणाऱ्या शिखर शिंगणापूरपासून दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मार्डी गावातील गवंडीकाम करणारे अंकुश सावंत यांचे कुटुंब राहते. त्यांची कन्या कोमल सावंत ही लहानपणापासूनच अभ्यासामध्ये हुशार होती. आपल्या वडिलांच्या सुसंस्कारित विचारांनी प्रेरित होऊन आपले वडील गवंडीकाम करतात हा दृष्टिकोन समोर ठेवून वडिलांचे व आपल्या कुटुंबाचे नाव आपण मोठे केले पाहिजे, हा उदात्त दृष्टिकोन मनामध्ये ठेवून तिने अभ्यासामध्ये सातत्य राखत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा यशस्वी करून महाराष्ट्रात नावलौकिक प्राप्त केला.

कोमलचे प्राथमिक शिक्षण गावातीलच कन्या प्राथमिक विद्यालय मार्डी येथे पहिली ते सातवीपर्यंत; तसेच माध्यमिक शिक्षण हे मराठीतच झाले. पुढील उच्च शिक्षण दहिवडी कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर तिने कोणत्याही प्रकारचा खर्च न करता, कोणताही क्लास न लावता स्वतःच्या जिद्द, चिकाटीच्या जोरावर व आत्मविश्वासावरती तिने हे यश संपादन केले.

कोमल सावंत हिच्याशी फलटणचे ‘न्यूज अनकट’चे प्रतिनिधी आनंद पवार यांनी संपर्क केला असता, कोमलने सांगितले, की माझ्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही माझे वडील व माझा छोटा बंधू गवंडीकाम करीत आमच्या घरसंसार चालवत. माझ्या अभ्यासामध्ये नेहमीच आर्थिक हातभार लावला आहे. माझा मोठा भाऊ हाही माझ्याबरोबर ‘एमपीएससी’चा अभ्यास करतोय. माझी आई गृहिणी असून, मी हे यश माझ्या परिवाराला अर्पण करीत आहे; तसेच मला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा असून, माझ्या आयुष्यात माझे सख्खे दोन्ही भाऊ, आई-वडील; तसेच रेल्वे सेवेतील विशाल सावंत यांचे मला विशेष असे सहकार्य लाभत आहे. इथून पुढे राज्यसेवेबरोबरच ‘यूपीएससी’ची परीक्षाही पास होणार असल्याची प्रतिक्रिया कोमलने दिली.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा