रत्नागिरी १३ डिसेंबर २०२३ : विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील कोंड्ये, कुरंग, रत्नागिरीमधील कुरतडे, पोमेंडी बु., संगमेश्वरमधील किरदुवे, कोंडकादामराव, गुहागरमधील कुडाली, चिपळूणमधील नारदखेरकी, देवखेरकी, खेडमधील भडगाव, चाकाळे, मंडणगडमधील देव्हारे, सावरी या गावात आज बुधवार दि.१३ डिसेंबर २०२३ रोजी विविध योजनांची माहिती देणारी व्हॅन फिरणार आहे. या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान विविध योजनांचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
अनेक योजनांची माहिती लोकांपर्यंत व्यवस्थित न पोहचल्याने त्यांच्या मनात अनेक योजनांबाबत संभ्रम असतो. तो संभ्रम दूर व्हावा, त्यांच्या शंकांचे निरसन व्हावे आणि योजनांच्या पात्रतेविषयी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करता यावी, हा उद्देश घेऊन योजनांची प्रचार, प्रसिद्धी व्हावी यादृष्टिने विकसित भारत संकल्प यात्रा हाती घेण्यात आली आहे. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांसाठी पात्रता असूनही, ज्या लोकांना विकासाच्या प्रवाहात येता आले नाही, त्यांना शासकीय योजनांचा विविध लाभ मिळावा या उद्देशाने हाती घेतलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला जिल्ह्यातील ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
गणेशगुळे येथे कृषी विभागामार्फत विविध मार्गदर्शन-
रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायत गणेशगुळे येथे विकसित भारत संकल्प यात्रेच्या अंतर्गत कृषी विभागामार्फत पीएम प्रणाम-रासायनिक खताला पर्यायी खतांचा वापर व व्यवस्थापन, माती परिक्षण आणि सेंद्रिय शेती याबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
या मोहिमेत आरोग्य, कृषी, आवास, आयुष्यमान भारत, पीएम गरीब कल्याण अन्न योजना, पीएम विश्वकर्मा, जन धन योजना, अटल पेन्शन योजना, बीमा योजना, पीएम पोषण अभियान, दीनदयाल अंत्योदय योजना आदींचा समावेश आहे. तसेच आदिवासी विभागासाठी विशेष योजना, स्कॉलरशिप योजना, मातृत्व वंदना योजना, उज्ज्वला योजना अशा विविध विभागांच्या योजनांचा यात समावेश असणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : केतन पिलणकर