लंडन, ५ सप्टेंबर २०२२: ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर कंझर्वेटिव्ह पार्टीत लिज ट्रस यांचा सामना भारतीय वंशाचे ऋषि सुनक यांच्याशी झाला आणि अखेर ऋषी सुनक यांना हरवत लिज ट्रस यांनी पंतप्रधान पदाची चुरस जिंकली. यावेळी पक्षाच्या १.६० लाख सदस्यांनी मतदान केले होते. एका सर्वेक्षणानुसार पक्षातील १० पैकी ६ सदस्य हे लिज ट्रस यांच्यासोबत होते.
लिज ट्रस या ४७ वर्षाच्या असून त्या इंग्लंडच्या नव्या पंतप्रधान म्हणून जाहीर झाल्या आहेत. लिज ट्रस आता बोरिस जॉन्सन यांची जागा घेतील. लिज यांना इंग्लंडच्या राजकारणातील फायरब्रांड नेत्या म्हणून ओळखले जाते. दोन महिने सुरु असलेल्या या निवडणुकीत त्या कायम आक्रमक भूमिकेतच होत्या. आक्रमकता या त्यांच्या विशेष गुणामुळे त्यांना जास्त मते मिळाल्याचा अंदाज आहे.
लिज ट्रस्ट यांचा जन्म ऑक्सफर्डमध्ये झाला. लिड्सच्या राऊंडहे स्कूल आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून त्यांचे शिक्षण झाले. त्यानंतर त्यांचा विवाह हग ओ लैरी यांच्यासोबत झाला. त्यांना दोन मुली आहेत. साउथ वेस्ट नॉरपॉक या मतदारसंघातून त्या निवडून आलेल्या आहेत. कंझर्व्हेटिव्ह म्हणजेच हुजूर पक्षाच्या खासदारांनी केलेल्या मतदानाच्या पाच राऊंडमध्ये ऋषि सुनक यांनी लिज ट्रस यांना मात दिली होती. मात्र अंतिम निर्णय हा पक्षाचे १ लाख ६० हजार सदस्य करणार होते. त्यात लिज यांनी बाजी मारली आणि अखेर त्या पंतप्रधान म्हणून घोषित झाल्या. लवकरच त्या ब्रिटनची सर्व सूत्रे हातात घेतील आणि नवीन राजकारणाला सुरुवात होईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस