महेश लांडगे यांच्याकडून शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी काढली, भाजपकडून राजेश पांडे यांना जबाबदारी

पुणे, ४ ऑगस्ट २०२३ : लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. भाजप नेते गिरीश बापट यांचे निधन झाल्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघांची जागा रिक्त झाली आहे. आता या ठिकाणी पोटनिवडणूक होण्याची शक्यता नाही. कारण त्यांच्या निधनानंतर अजूनही पोटनिवडणूक जाहीर झाली नाही. यामुळे भाजपने मिशन २०२४ ची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी लोकसभा मतदार संघानुसार जबाबदारी निश्चित केली गेली आहे. या प्रक्रियेत भारतीय जनता पक्षाने, आमदार महेश लांडगे यांना धक्का दिला आहे.

दोन महिन्यांपूर्वी पुणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघात भाजपकडून समन्वयक नेमले होते. पुणे लोकसभा मतदार संघाची जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांच्याकडे दिली. त्याचबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी राहुल कुल यांच्याकडे दिली. तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी महेश लांडगे यांच्यांकडे दिली होती. परंतु आता शिरुरची जबाबदारी महेश लांडगे यांच्याकडून काढून घेतली आहे. आता ही जबाबदारी राजेश पांडे यांच्याकडे देण्यात आली आहे.

राजेश पांडे हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून भाजपमध्ये आले आहेत. ते अभाविपचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यावेळी अभाविपचे संघटन त्यांनी मोठ्या कौशल्याने सांभाळले होते. आता भाजपचे ते उपाध्यक्ष आहेत. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी मोठी कामगिरी केली आहे. पुणे विद्यापीठ आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्राधिकरणावर त्यांनी काम केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मधून मांडलेली मेरी माटी, मेरा देश या देशव्यापी अभियानाच्या संजोयकपदी राजेश पांडे यांना नेमले आहे. देशासाठी प्राणांची बाजी लावलेल्या हुतात्म्यांच्या सन्मानार्थ स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्वानिमित्ताने मेरी माटी मेरा देश हा उपक्रम साकारला जात आहे. या उपक्रमाची महाराष्ट्राची जबाबदारी राजेश पांडे यांच्याकडे दिली गेली आहे. या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे.त्यामुळे शिरूर लोकसभेच्या माध्यमातून राजेश पांडे यांच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा