मुंबई, ३ नोव्हेंबर २०२०: फोर्ब्स जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर करत असते. फोर्ब्स रियल टाइम बिलेनियर या यादीमध्ये अशा लोकांची क्रमवारी जाहीर केली जाते. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती व उद्योजक मुकेश अंबानी हे सतत जगातील १० श्रीमंतांपैकी एक राहिले आहेत. काही दिवसांपूर्वी ते पहिल्या पाच स्थानांमध्ये होते. मात्र, त्यांची घसरण होऊन ते सहाव्या स्थानापर्यंत आले होते. मात्र, काल शेअरबाजारात रिलायन्सच्या शेअर मध्ये झालेल्या घसरणीमुळं त्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळं आता त्यांचं हे स्थान नवव्या क्रमांकावर गेलं आहे.
गेल्या काही दिवसात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर मध्ये १५ टक्क्याहून अधिक घसरण झाली आहे. काही महिन्यांपासून रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत होती. त्यामुळं या कंपनीचा शेअर वधारला होता. त्यामुळं मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत देखील प्रचंड वाढ झाली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये सातत्यानं घसरण होत. आहे त्याचा परिणाम आता त्यांच्या संपत्तीवर ही झाला आहे. फोर्ब्स रियल टाइम बिलेनियरच्या यादीनुसार मुकेश अंबानी यांच्या कमाईत ५० हजार ६५८ कोटी रुपयांची घट झाली आहे. आता त्यांची संपत्ती ७१.५ अब्ज डॉलरवर येऊन पोहोचली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये सोमवारी ८.६ टक्क्यांची घसरण पाहायला मिळावली. २३ मार्चनंतर रिलायन्स इंडस्ट्रिजच्या शेअर्समधील ही सर्वाधिक घसरण आहे. गेल्या ७ महिन्यात रिलायन्सचे शेअर्स सर्वाधिक घसरले आहेत. यामुळं मुकेश अंबानी यांना ६.८ अब्ज डॉलर म्हणजे ५० हजार ६५८ कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे