नागपूर, १९ मार्च २०२४ : नागपूर ॲक्शन ग्रुपचे अध्यक्ष विश्वजीत सिंग यांचे वडील सामाजिक कार्यकर्ते शिवबहादूर ठाकूर सायंकाळी हेल्मेट घालून आकाशवाणी चौकातून जात असताना एका अज्ञात व्यक्तीने ठाकूर यांच्या वाहनाला धडक दिली त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. यात ठाकूर यांचा दोष आहे का? असा सवाल विश्वजीत सिंग यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. शिवाय एक महिना उलटून गेल्यानंतरही त्यांच्या वाहनाला धडक देणारी कार आणि त्याच्या चालकाचा अजूनही पत्ता न लागल्याने तपास यंत्रणा आणि पोलिसांच्या दिरंगाईवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागपूर शहरात गेल्या २ महिन्यात झालेल्या २१२ हून अधिक रस्ते अपघातात ७३ जणांना आपला जीव गमावला आहे. यापैकी काही प्रकरणांमध्ये पोलिसांनी दोषींवर कारवाई केली तर काही घटनांमध्ये अज्ञात व्यक्तींच्या नावावर असलेल्या अपघाताच्या प्रकरणांना स्थगिती देण्यात आली. त्यामुळे अपघातात सहभागी असलेल्या लोकांची चौकशी न करणे आणि दोषींवर कारवाई न केल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका निर्माण होत आहे.
सात वर्षांपूर्वी २०१६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात नागपूर शहरात स्मार्ट सिटी अर्बन डेव्हलपमेंट योजनेंतर्गत ३७०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते, ज्यांची देखभाल L&T कंपनीकडून केली जात आहे. पण अपघाताचे एकही सीसीटीव्ही फुटेज न मिळाल्याने नागरी सुरक्षेबाबत यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शिवाय नागपूर शहराला २०२० मध्ये सुरक्षित आणि स्मार्ट सिटीचा पुरस्कार मिळाला असला तरी नागपूर शहर नागरिकांसाठी सुरक्षित नाही, हे अपघातांच्या संख्येवरून स्पष्ट होत आहे. अपघाताच्या कारणांचा शोध घेऊन दोषींवर कारवाई करून न्याय मिळवून देणे हे पोलिस प्रशासनाचे कर्तव्य आहे, मात्र पोलिस प्रशासन सर्वसामान्य नागरिकांबाबत गंभीर नाही. गडकरींच्या मुलाचा किंवा फडणवीसांच्या मुलीचा किंवा त्यांच्या आई-वडिलांचा अपघात झाला असता तर कदाचित एका दिवसात तपास करून दोषींना अटक करून कारवाई केली गेली असती. प्रशासन नागरिकांप्रती गंभीर नाही. समाजसेवक शिवबहादूर सिंह ठाकूर यांचा अपघाती मृत्यू होण्याचे कारण महिना उलटूनही कळत नसल्याने पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागपूर महानगरपालिकेने शहरात ठिकठिकाणी सिमेंट रस्त्याचे काम ठेकेदारांमार्फत सुरू केले आहे. त्यातील एक रस्ता जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून महाराज बागमार्गे आकाशवाणी चौकापर्यंत आहे. त्याचे कंत्राटदार ACEPL लिमिटेडचे अभिषेक विजयवर्गीय आहेत. बॅरिकेड्स लावून रस्ते बांधणीच्या कामात सुरक्षा नियमांचे पालन करून योग्य ती व्यवस्था करणे ही कंपनीची जबाबदारी होती.परंतु ठेकेदाराच्या सदोष बांधकाम पद्धती आणि कामामुळे अपघातात प्राण गमावलेल्या शिवबहादूर सिंह ठाकूर यांच्या कुटुंबाकडून ACEPL लिमिटेड या कंत्राटदार कंपनीचे संचालक अभिषेक विजयवर्गीय यांच्यावर खटला दाखल करून दोषीवर मनुष्यवधाच्या कलमाखाली कारवाई करण्याची विनंती करण्यात आली आहे.
या परिषदेत नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, नागपूर शहरात गेल्या २ महिन्यांत झालेल्या रस्ते अपघातात ज्यांना प्राण गमवावे लागले त्यांना भावनिक श्रद्धांजली अर्पण करत सरकारला या सर्व प्रकरणांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याची विनंती केली आहे. मोठ्या विकसित शहरांमध्ये जीवनाला सर्वात जास्त महत्त्व असते. जेव्हा नागरिकांचे जीवन सुरक्षित नसते तेव्हा जीवनमान उंचावण्यासाठी उभारण्यात आलेल्या मोठे रस्ते, पूल, मेट्रो यासारख्या सोयी-सुविधांचे औचित्य काय असेल? कोट्यवधी रुपये खर्चून, मोठे नियोजन करून सिमेंट रस्ते केले जातात. ते बनवताना नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून ते पूर्ण करावे. जेणेकरून नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये. याची काळजी घेण्यात यावी असेही विश्वजीत सिंग म्हणालेत. या पत्रपरिषदेत त्यांच्यासह त्यांची आई आणि भावंड उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : नीता सोनवणे