मुंबई, २ जानेवारी २०२३ देशात दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यात
गुरुवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार नोव्हेंबरमध्ये देशात बेरोजगारी दर ८ टक्के नोंदविण्यात आला. ऑक्टोबरच्या ७.७७ टक्क्यांच्या तुलनेत आणखी वाढ झाली आहे. तसेच गेल्या तीन महिन्यांमधील हा उच्चांक ठरला आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
काय म्हणाले नाना पटोले?
बेरोजगारीने मागील १६ महिन्यांतील आतापर्यंतचा सर्वात मोठा उच्चांक गाठला आहे. पंतप्रधान मोदी तुम्हाला तरुणांना नोकऱ्या देता येत नसतील, तर किमान ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या नोकऱ्या घालवून त्यांचं आयुष्य तरी उध्वस्त करु नका, असे नाना पटोलेंनी म्हटले आहे.
- शिंदे-फडणीस सरकारवर टीका
याशिवाय, राज्य सरकारकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या निधीमुळे भविष्य निर्वाह निधी (पीएफ), उपदान (ग्रॅच्युइटी) रक्कमेचा एसटी महामंडळाकडून गेल्या चार ते पाच महिन्यांपासून एसटीच्या ट्रस्टकडे भरणाच केलेला नाही. ही रक्कम सुमारे ५०० कोटी रुपयांपर्यंत असून त्यामुळे एसटीच्या राज्यातील ८८ हजार कर्मचाऱ्यांना फटका बसला आहे. या संदर्भात त्यांनी एक ट्विट केले आहे.
- नाना पटोले यांचे ट्विट
ईडी सरकार मागील काही महिने एसटी महामंडळाला अपुरा निधी देत आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांचा PF जमा होत नाही. आमच्या सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांचा राजकारणासाठी पुरेपूर वापर करून घेणारे भाजप आता मात्र त्याच कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.