नाशिक, १ जानेवारी २०२३ : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नाशिकमध्ये मोठी घटना घडली आहे. नाशिकमधील इगतपुरी गावापाशी असलेल्या जिंदाल कंपनीत भीषण असा स्फोट झाला आहे. यामुळे कंपनीला मोठी आग लागली आहे. या कंपनीत कामकरत असलेले २० ते ३० कर्मचारी अडकल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंत ३ कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इगतपुरी मुंडे या गावजवळ असलेल्या जिंदाल कंपनीत सकाळी १०.३० च्या सुमारास भिषण स्फोट झाला. या स्फोटाचा खुप मोठा आवाज झाला. पॉलिफिल्मची निर्मिती करणाऱ्या जिंदाल ग्रुपच्या या कंपनीत स्फोट झाला. कंपनीत साधारणता २००० कर्मचारी असल्याची माहिती मिळाली आहे. या आगीमध्ये अनेक कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच, अग्नीशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून, आग विझवण्याचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, आतापर्यंत अकरा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. जखमींना नाशिकच्या सुयश रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.